प्रमोद सुकरे
कराड :
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांचे मनोमिलन व्हावे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्याला यश येत नाही म्हटल्यावर आता या चर्चेतून मी बाहेर पडत असल्याचे सोमवारी त्यांनी स्वत:च सांगितले. जणू त्यांनी माघारच घेतली, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात ते कोणाचा प्रचार करणार, याबाबत त्यांनी मौन पाळले आहे. मात्र त्याची उत्सुकता सभासद कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे.
सहकारी साखर कारखानदारीत वेगळी ओळख असणारा कारखाना म्हणून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतील चार तालुक्यांत याचे कार्यक्षेत्र आहे. ४७ हजारांवर ऊस उत्पादक याचे सभासद आहेत. अशा या कारखान्याची निवडणूक तर राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानली जाते. हीच निवडणूक २९ जून रोजी होत असून, राजकीय घडामोडी गतिमान झालेल्या आहेत.
सध्या कारखान्यात डॉ. सुरेश भोसले व डाॅ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलची सत्ता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंदाजे एक वर्षाचा कार्यकाल विद्यमान संचालक मंडळाला वाढवून मिळाला आहे. मात्र होऊ घातलेल्या निवडणुकीत भोसले हे भाजपवासी असल्याने त्यांना रोखण्यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत.
कारखाना निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व काँग्रेस विचाराचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हे दोघेही डॉ. भोसले यांचे विरोधक आहेत. डॉ. सुरेश भोसले यांच्या विरोधात डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल, तर अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल असे दोघांनीही दंड थोपटले आहेत. अशा परिस्थितीत डॉ. अतुल भोसले यांचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख विरोधक असणाऱ्या माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन माजी अध्यक्ष मोहितेंना एकत्र आणण्यासाठी खलबते केली. जोडीला सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, अॅड. उदयसिंह पाटील यांनाही घेतले. गत चार महिन्यांत मुंबई, पुणे, कोल्हापूर, कराड येथे अनेक बैठका केल्या. पण चर्चेचे गुऱ्हाळ संपले नाही. आपण केलेल्या प्रयत्नाला यश आले नसल्याचे स्वतः आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार चव्हाण यांनी आपण त्यांच्या मनोमिलनाच्या चर्चेतून बाहेर पडलोय हे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीत काय भूमिका असणार, याबाबत मात्र बोलणे टाळले आहे. त्यामुळे आमदार चव्हाणांच्या ''कृष्णा''तील भूमिकेबाबत कराड तालुक्याच्या राजकीय पटलावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आता या चर्चांना त्यांनाच पूर्णविराम द्यावा लागेल.
चौकट
त्या उमेदवारी अर्जांचे काय ...
कारखाना निवडीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती असणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नाना पाटील, जखिनवाडीचे माजी सरपंच अॅड. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचे वडील बापूसाहेब मोरे या तिघांनीही रयत पॅनेलच्या वतीने अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करतेवेळी मोहितेंच्या मनोमिलनाची चर्चा होती. आता या चर्चेतून पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष काढले असल्याने प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे दाखल केलेल्या या उमेदवारी अर्जांचे काय होणार? हे उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात दिसणार का, यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.
चौकट
दोघांचीही झाली होती मदत ..
गत विधानसभा निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या दोघांचीही मदत झाली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी हे दोघेही एका व्यासपीठावर आले होते. पण आता हे दोन्ही मोहिते कृष्णेच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल करून लढत असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. एका कोणाला मदत करायची, हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. आता हा प्रश्न चव्हाण कसा सोडविणार, हे पाहावे लागेल.
फोटो
पृथ्वीराज चव्हाण