सातारा : जिल्ह्यात खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात उद्धवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून आज, सोमवारी साताऱ्यात एका कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढत टाळेही ठोकण्यात आले. यावेळी संबंधित कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना खासगी फायनान्स कंपन्यांविरोधात निवेदन दिले होते. खासगी फायनान्स कंपनीकडून गैरकारभार आणि गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. खासगी सावकारापेक्षाही अत्यंत वाईट पध्दतीने कर्ज वसुली करत आहेत. एखाद्या महिन्याचा कर्जाचा हप्ता थकला तर चेक बाउसिंग चार्जेस वसूल करण्यात येत आहे. घरी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीना पाठवणे, अर्वाच्छ भाषेत महिला, वयोवृध्द आणि लहान मुलांसमोर बोलण्यात येते. साहित्य, वाहने जबरदस्तीने ताब्यात घेतली जातात. सातारा तालुक्यातही वसुलीच्या तगाद्याला आणि गुंडगिरीला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. त्यामुळे कंपन्यांच्या मनमानी कारभारावरती प्रशासनाचा कुठेही वचक नाही. यासाठी उध्दवसेनेच्यावतीने धडा शिकवला जाईल, असा इशारा दिलेला. त्यानंतर चारच तीनच दिवसांत राडा झाला.शहरातील गोडोली भागात खासगी फायनान्स कंपनीत उद्धवसेनेचे पदाधिकारी घुसले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी तसेच कंपनीच्या कारभाराचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर कार्यालयात आॅइल टाकण्यात आले. तसेच काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. यामुळे कर्मचाऱ्यांना भीती निर्माण झाली होती. त्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकण्यात आले. यावेळीही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
साताऱ्यातील खासगी फायनान्स कंपनीने मुजोरी, गुंडगिरी आणि अतिरेकी वसुली करत सामान्यांचे जगणे अवघड केले होते. कंपनीच्या त्रासाने एका महिलेला जीव गमवावा लागला. त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. कंपनीचे लोक घरात घुसून गुंडगिरी करतात. उद्धवसेनेने या कंपन्याविरोधात मोहीम हाती घेतली असून रस्त्यावर उतरुनही धडा शिकवणार आहे. - सचिन मोहिते, जिल्हाप्रमुख उद्धवसेना