खंडाळा : वाई विधानसभा मतदार संघातील जलसिंचनाची प्रलंबित कामे व खंडाळा तालुक्याला वरदायिनी ठरलेल्या नीरा-देवघर प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागावीत, शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे जलसिंचनाचे हे प्रकल्प मार्गी लागून पाण्याचा प्रश्न निकालात निघण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
वाई मतदार संघातील जलसिंचनाची काही कामे प्रलंबित आहेत. या सर्व योजनांना अपेक्षित निधी उपलब्ध झाला तरच त्या मार्गी लागणार आहेत. शेतीपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांची आग्रही मागणी होती. त्यामुळे नीरा-देवघर प्रकल्पातील गावडेवाडी, शेखमीरेवाडी आणि वाघोशी येथील उपसा सिंचन योजनांची कामे सुरु करण्यासाठी निविदा काढणे, कालव्याची ६५ किलोमीटर वाघोशीपासून पुढील कामे मार्गी लागावीत व कालव्यांचे काम व पोटपाटाची कामे पूर्ण करण्यासाठी निधीची भरीव तरतूद करावी, खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम - बलकवडी कालव्याच्या वरील बाजूच्या ११ गावांना कालव्यातून उपसा पद्धतीने पाणी मिळण्याबाबतची योजना तयार करणे याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
वाई तालुक्यातील कवठे-केंजळ उपसा जलसिंचन योजना, नागेवाडी मध्यम पाटबंधारेची उर्वरित कामे व जांभळी खोऱ्यातील गावांसाठी उपसा जलसिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव बी. के. गौतम, कार्यकारी संचालक गुणाले, पी. एन. मुंडे, पुणे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, सातारा प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डुबल व अधिकारी उपस्थित होते.