आॅनलाईन लोकमतफलटण , दि. २४ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली पालखीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्याची खबरदारी जिल्हाधिकारी वेळोवेळी प्रत्येक विभागाला देत असतात. मात्र, पालखी मार्गावर असणाऱ्या पुलाची अवस्था काय आहे. तसेच सध्या पावसाळा असल्याने चुकून नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास ओढे, नाल्याला पुराचे पाणी आल्यास, हे पाणी पुलावरुन वाहू लागल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग खबरदारी म्हणून उपाययोजना काय राबवणार ? असा प्रश्न वारकरी मंडळी व मार्गावरील ग्रामस्थांमधून होत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातून जातो. आळंदी ते पंढरपूर चौपदरी पालखी महामार्ग प्रशासनाने मंजूर केला आहे. परंतु, अनेक वर्षे झाली पालखी मार्ग रखडलेलाच असून दरवर्षी यामागार्ची किरकोळ डागडुजी केली जाते. वारकरी मंडळींना मात्र प्रवासात होणारा खडतर त्रास सहन करावा लागतो. अनेकदा अपघाताने वारकऱ्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. वारी दरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत अनेकदा प्रशासनासोबत बैठकी होतात. परंतु यावरती कायम स्वरुपी तोडगा काढला जात नाही. निधीअभावी तात्पुरती मलमपट्टी होत असते. याबाबत खबरदारी कधी घेणार? असा सवाल वारकरी मंडळींमधून होत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान आणि पावसाळा बरोबरच असतो. या वारीत लाखो वारकरी पावसाच्या सरी अंगावर झेलत माऊली-माऊलीचा जयघोष करीत प्रवास करतात. प्रवासात अपुरा रस्ता वाहनांची कोंडी तसेच पालखी मार्गावर ओढे, नाले असल्याने याची साफसफाई केली गेली नाही. अनेक ठिकाणी पूल नाहीत. आहेत ते पण जुने झाल्याने त्याची डागडुजी संबंधित विभागामार्फत केली जात नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्याने या भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. या पालखी मार्गावर अनेक ठिकाणी ओढे, नाले आहेत. पुराचे पाणी रस्त्या खालून वाहून जाण्यासाठी पूल नाहीत. त्यामुळे चुकून जोरात पाऊस आल्यास नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास सबंधित विभागाकडे पयार्यी व्यवस्था उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. यावर प्रशासन काय उपाययोजना शोधून काढणार हा प्रश्न आहे.
पयार्यी व्यवस्था नाही...
लोणंद-फलटण-बरड जिल्हा हद्दीपर्यंत पालखी मार्गावर निंभोरे (ओढा) फलटण (गणेशेरी ओढा), विडणी (अब्दागिरेवाडी ओढा), विडणी गाव (ओढा) या ठिकाणी पावसाने पूर आल्यास पालखी मार्ग पूर्णपणे बंद पडतो. याला पर्याय व्यवस्था काहीही नाही.
अनेकवेळा प्रसंग निर्माण
विडणी येथील गाव ओढा हा नदीवजा आहे. या मार्गावर छोटा पूल आहे. परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पुलामध्ये पाणी बसत नाही. पुराचे सर्व पाणी महामार्गावरुन जाते. यामुळे दोन-तीन तास महामार्गावर वाहतूक बंद पडून दोन्ही बाजूस दोन-तीन किलोमीटर वाहनांचा रांगा लागतात. दहा वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईहून अकलूजकडे जात असताना जोरात पाऊस पडल्याने ओढ्याला पूर आला होता. त्यांच्या चालकाने अंदाज न घेता गाडी पाण्यात घातली. पाण्यास प्रचंड प्रवाह होता. त्यांची गाडी मध्येच बंद पडून अडकली. सुदैवाने पोलिस व्हॅन बरोबर असल्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढून मोठा धोका टाळता आला.