कऱ्हाड : शहरातील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे क्रेन आहे. या क्रेनद्वारे ‘नो पार्किंग’मधील वाहने पोलिस ठाण्यात आणण्यात येतात. संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, सध्या कारवाई होऊनही शहरात बेशिस्त पार्किंगचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. चालक जागा मिळेल त्याठिकाणी वाहने उभी करीत आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा होतोय.कऱ्हाडसह मलकापूर शहरात दिवसेंदिवस वाहनाची संख्या वाढू लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यातच पार्किंगचा प्रश्न आ वासून उभा आहे. कऱ्हाडात कोठेही पार्किंग झोन नाही. त्यामुळे वाहने पार्क कुठे करायची, असा प्रश्न पडतो. शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्किंगची मोठी समस्या आहे.यावर तोडगा म्हणून सम-विषम पार्किंगचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र, तरीही हा प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेला नाही. सम-विषम पार्किंग असले तरी रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होतेच. त्यातच एखाद्याने नियमबाह्य पार्किंग केले तर कोंडीत आणखी भर पडते. ही परिस्थिती उद्भवू नये. तसेच पार्किंगला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिस क्रेनसह बाजारपेठेसह अन्य रस्त्यांवर फिरत असतात.नो पार्किंगमधील वाहनांवर त्यांच्याकडून कारवाई केली जाते. चालकाकडून दंड घेतला जातो. मात्र, सध्या कारवाई होऊनही दुपारच्या वेळेत मुख्य बाजारपेठेमध्ये अस्ताव्यस्त पार्किंग पाहायला मिळते. दुचाकी तसेच चारचाकी चालक जागा मिळेल त्याठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे कोंडी निर्माण होते.
कऱ्हाडात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न गंभीर, वाहतुकीला अडथळा; कारवाई करूनही चालकांचा आडमुठेपणा
By दीपक शिंदे | Published: April 20, 2023 6:19 PM