परळी : ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशीच काहीशी परिस्थिती या भागाची झाली आहे. जलसंधारणाचे मोठे चार प्रकल्प या भागात असले तरी शेतीसाठी पाण्याचा तुटवडा, येथील लोकप्रतिनिधींचे अपयशच आहे. मात्र, या भागातील धरणग्रस्तांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मी स्वतः मांडून शंभर टक्के काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. कृषी पर्यटनासंदर्भातही उपाययोजना करण्यात येतील’, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.
भोंदवडे येथील झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परळी भागातील मनसे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. कृषीमंत्र्यांच्या हस्ते नित्रळ येथील अतिवृष्टी आपद्ग्रस्त नंदा वांगडे यांना रोख रक्कम देऊन अर्थसाह्य केले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, नारायण निकम, श्यामराव लोटेकर, जिल्हा संघटिका शारदा जाधव, रंजना भोसले, एकनाथ ओंबळे, अनिल गुजर, अतिश ननावरे, विश्वनाथ धनावडे, बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, सचिन जवळ, प्रणव सावंत, रूपाली लेंबे, मंजिरी सावंत, अमर मोहिते, हनुमंत भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘पीकविमा यासंदर्भात शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे तसेच पंधरा दिवसांच्या आत कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली. मात्र, या परळी भागातील नेतृत्व खंबीर नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत तसेच निवडणुकीत मते देऊन अकार्यक्षम माणसांना तुम्ही मोठमोठी पदे दिली, ही सगळी खिचडीही तुम्हीच घातलेली आहे.
सचिन मोहिते म्हणाले, ‘या मतदारसंघात चार मोठी धरणे बांधलेली आहेत. यांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. धरणे तयार होऊन वीस वर्षे झाली तरी स्थानिक नेत्यांना या धरणग्रस्तांची व्यथा कधी समजणार, असाच प्रश्न उभा राहत आहे. धरणे बांधून वीस वर्षे झाली तरी वर सरकून राहिलेल्या लोकांना शेतीसाठी पाणीप्रश्न तसेच धरणाच्या खाली असलेल्या शेतीसाठी कॅनालचा पाणीप्रश्न प्रलंबितच आहे. कारण, खाली कॅनॉल नाही आणि वरच्या भागासाठी पाइपलाइनद्वारे केलेले पाइप नाहीत. मग, हा शासनाकडून आलेला सर्व निधी गेला तरी कुठे, यासंदर्भातही चौकशी नक्कीच झाली पाहिजे.’
(चौकट)
नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजारांची सूट...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना अन्नदेवता म्हणून संबोधतात. यामुळेच सरकार स्थापन झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत कोरोनाकाळ असूनही ३१ लाख जणांना कर्जमुक्त केले तसेच यासाठी २१ हजार कोटी राज्य सरकारने उभे केले. एवढ्या मोठ्या महामारीत आर्थिक अडचण असतानादेखील एवढी मोठी रक्कम महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत मदत देणारे हे पहिले सरकार आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजारांची सूटदेखील देण्याची तरतूद केली होती, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
फोटो..
२६परळी
भोंदवडे (ता. सातारा) येथे शनिवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात कृषीमंत्री दादा भुसे यांनी मार्गदर्शन केले.