सातारा: गावातील भारुडाचा कार्यक्रम बंद पाडून एकाने तिघांवर धारदार शस्त्राने वार केल्याची खळबळजनक घटना जावळी तालुक्यातील म्हसवे वडाचे येथे रविवारी (दि. १५) घडली. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम प्रकाश शिर्के (रा. म्हसवे वडाचे, ता. जावळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवे वडाचे येथे रविवारी रात्री गावात भारुडाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी संशयित संग्राम शिर्के हा दारू पिऊन तेथे आला. गावातील लोकांना शिवीगाळ करून हा भारुडाचा कार्यक्रम त्याने बंद पाडला.त्याला समजावण्यास गेलेल्या अनिकेत पंढरीनाथ शिर्के तसेच त्याचे वडील पंढरीनाथ आणि भाऊ अविनाश यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने त्याने वार केले. यामध्ये तिघेही जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिकेत शिर्के याच्या तक्रारीवरून पोलिसांनी संग्राम शिर्केवर गुन्हा दाखल केला आहे.
भारुडाचा कार्यक्रम बंद पाडून तिघांवर धारदार शस्त्राने वार, जावळी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 6:30 PM