खंडाळा : ‘सावित्रीबाई फुले यांनी महिलांना त्यांचे अस्तित्व दिले. शिक्षण व ज्ञानदानाचे त्यांचे विचार प्रत्येक महिलेने आत्मसात केल्यास कुटुंबाबरोबरच समाजाची प्रगती होईल,’ असे प्रतिपादन महाडच्या गटशिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी केले.
नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात सुलोचना भुजबळ यांच्या ‘सेवाव्रताची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुण आदलिंगे, शुभांगी नेवसे, जयश्री जमदाडे, सुजाता भुजबळ, मीना नेवसे, अर्चना नेवसे, संगीता अडसूळ, पूनम नेवसे, सुरेखा नेवसे, साधना नेवसे, भारती ननावरे, राजश्री राऊत, सुप्रिया नेवसे, अर्चना नेवसे, पूजा नेवसे, अक्षदा नेवसे आदी उपस्थित होत्या.
गटशिक्षणाधिकारी यादव म्हणाल्या, ‘शिक्षणातून जीवनातील खरे-खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे, हा सावित्रीबाईंचा आग्रह होता. सावित्रीबाईंच्या कार्याचा परिचय व्हावा, या हेतूने साकारलेल्या या पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे. मुलगी शिकल्यास समाजात सुधारणा होऊन तो प्रगतीपथावर जाईल, हे महत्त्व पटवण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे.’
आदलिंगे म्हणाले, ‘फुले दाम्पत्याचे विचार व साहित्य समाजाला कायम दिशा देत आहे. नायगाव हे देशाच्या दृष्टीने प्रेरणास्थान असून, सामाजिक न्यायाचे ऊर्जा केंद्र आहे. सावित्रीबाईंच्या जन्मगावी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून साकारलेल्या स्मारकास महिलांनी आवर्जून भेट दिली पाहिजे.’
.............................
०७ खंडाळा पुरस्कार
नायगाव येथे ‘सेवाव्रताची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अरुणा यादव, शुभांगी नेवसे, सुजाता भुजबळ, अरुण आदलिंगे आदी उपस्थित होते.