सातारा : गुढीपाडवा हा सण दि. १३ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे आदेश जिल्हधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ मधील तरतुदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार गुढीपाडवा सणानिमित्त पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
गुढीपाडवा हा सण कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत साधेपणाने सकाळी ७ वा.पासून ते रात्री ८ वा.पर्यंत साजरा करावा. आता सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सिंगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इ.) पालन करून घरगुती गुढी उभारून हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा. या सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पूर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि, आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड-१९ विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष गुढीपाडवा सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरून व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.