सातारा : डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या जीवघातकी आजारांपासून बचावासाठी शासन प्रबोधन करत आहे. उघड्यावर साचून राहणारे पाणी टाकण्यासाठी प्रात्यक्षिकही करून दाखवित आहे. परंतु सातारा तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्षे उघड्यावर पाणी साचून राहत असून, या परिसरात डासांचे प्रभुत्व वाढले आहे. त्यामुळे येथे रोगांचा प्रसार होत असल्याची नागरिकांनी शंका उपस्थित केली असून, निरोगी राहण्यासाठी आता शासकीय कार्यालयांनाच प्रबोधन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली आहे. सातारा तहसील कार्यालय शहराच्या मध्यठिकाणी आहे. या ठिकाणी दररोज हजारो नागरिक ये-जा करीत असतात. परंतु सध्या या ठिकाणी डासांचे प्रभुत्व वाढले असून, तहसील कार्यालयातील काही ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या कार्यालयातील मुद्रांक विक्रेते, पक्षकार, काही राजकीय व्यक्ती नाक धरूनच कामे करत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी वाळू व्यावसायिकांवर कारवाई करून वाळू उपसा करणारी बोट तहसीलदार कार्यालयाने ताब्यात घेतली असून, ती बोट प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळच ठेवण्यात आली असून, मागील दोन-तीन वर्षांपासून या बोटीत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासाची पैदास होत असून, सायंकाळी पाच वाजल्यापासून येथे काम करणेही अवघड झाले आहे. याचा त्रास केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच कामानिमित्त तालुक्यातून आलेल्या नागरिकांना होत आहे. याचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी) २० वर्षांच्या टाक्या उघड्यावर या कार्यालयाच्या आवारात पाण्यासाठी मागील २० वर्षांपासून साठवण टाक्या काढण्यात आल्या आहेत. त्या टाक्याही वापराविना पडून असल्याने सध्या या दोन्ही टाक्यांची झाकणे उघड्यावर असून, या टाकीत मोठ्या प्रमाणात घाण साचली असून, पाण्यातून उग्र वास येत आहे आणि याच टाकीतून डासांची निर्मितीही मोठी होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. कार्यालयात वाढली झुडपे याच कार्यालयातील नगर भूमापन अधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत तर काना-कोपऱ्यात कचरा साठला आहे. यामुळे येथेही दुर्गंधी पसरली असल्याने दिवसा मच्छरांचा त्रास सहन करावा लागत आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी अनेकवेळा केली स्वच्छतेसाठी मागणी संपूर्ण तहसीलदार कार्यालयालगत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे. कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. तर अनेक ठिकाणी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांचा प्रमाण वाढले असून, यातील काही मुद्रांक विक्रेत्यांना डेंग्यू आणि मलेरियाचीही लागण झाली होती. यासाठी तहसीलदारांना येथील मुद्रांक विक्रेत्यांनी साफ-सफाईची मागणी अनेकवेळा केली. परंतु आजही परिस्थिती जैसे-थे आहे.
‘तहसील’मधूनच रोगांचा प्रसार !
By admin | Published: October 21, 2016 11:33 PM