सातारा : सोशल मीडियाचा गैरवापर व त्यातून होणाऱ्या अनेक दुर्दैवी घटना आपण सध्या पाहत व ऐकत असतो. पण याच सोशल मीडियातून गरीब व गरजूंना मदत करण्याच्या आवाहनाला भाईंदर येथून तब्बल ३०० किलोमीटरचा प्रवास करून जवळवाडी येथील गोपाळ समाजाला उद्योजक प्रशांत धोंडे यांनी केलेली मदत कौतुकास्पद आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर समाजहिताचा असलयाचे मत मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पाेलीस निरीक्षक अमोल माने यांनी व्यक्त केले.
जवळवाडी येथील गोपाळवस्तीतील गरीब व गरजू कुटुंबांची उपासमार थांबावी यासाठी जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा जवळ यांनी सोशल मीडियावरून मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धोंडेवाडी गावचे सुपुत्र व भाईंदरस्थित युवा उद्योजक प्रशांत धोंडे यांनी जीवनावश्यक वस्तुंची पूर्णकीट गोपाळ समाजातील सर्व कुटुंबियांना देण्यासाठी उपलब्ध केली. त्याचे वाटप मेढा पोलीस स्टेशनचे अमोल माने यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी बोलताना ते म्हणाले, सोशल मीडियाचा योग्य वापर समाजहिताचा ठरणारा आहे. हेच आजच्या धोंडे यांनी केलेल्या मदतीवरून दिसून येते. समाजातील अनेक दानशूर व सृजनशील लोकांनी पुढे येऊन गरीब व गरजू लोकांना मदत करायला हवी.
जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंंच वर्षा जवळ या वेळी बोलताना म्हणाल्या, की सोशल मीडियामुळेच ३ लाखांहून अधिक लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीने विकासकामे केल्याचे सांगितले.
या वेळी अर्जुन धोंडे, लक्ष्मण धोंडे, आनंदा धोंडे, सुशांत धोंडे, अरुण जवळ, शामराव चव्हाण, राजेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.
..........