हणमंत यादवचाफळ : कृषिक्षेत्राची प्रगती झपाट्याने होत असताना नैसर्गिक आपत्तीबरोबर पिकावरील शत्रूकीड, खोडकिडा, गादमाशी, नवीन लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे. या शत्रूकिडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ (ता. पाटण) येथील मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी ‘सुचंद्र प्रकाश सापळा’ तयार केला आहे. या सापळ्यामुळे पिकांचे किडीपासून संरक्षण होऊ लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हातातोंडाशी आलेल्या पिकांवर हल्लाबोल चढवणाऱ्या पतंगवर्गीय शत्रूकिडी या अतिशय खादाड व प्रचंड नुकसान करणाऱ्या आहेत. खोडकिडी, गादमाशी, लष्करी अळीमुळे पिकांचे खूप नुकसान होते. परिणामी, उत्पन्नात घट होते. शेतकऱ्यांना झालेला खर्चसुद्धा परत मिळत नाही. शत्रूकिडींची उत्पत्ती झाल्यानंतर कीड मोठी होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढल्यानंतर शेतकऱ्यांमार्फत रासायनिक औषधांचा प्रचंड वापर सुरू होतो. त्यामुळे वातावरणात प्रदूषण पसरून जलस्रोत विषारी होऊन जीवसृष्टीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आजवर दिसून आले आहे.
चंद्रकांत कोळी यांनी प्रायोगिक तत्त्वावर हेमंत परशराम बागडेरिया यांच्या हरभरा व उन्हाळी भात पिकात अमावास्या काळात प्रकाश सापळा लावला होता. या सापळ्यात खूप प्रमाणात शत्रूकिडींचे म्हणजे खोडकिडीचे पतंग, गादमाशी, सुरळीतील अळीचे पतंग, फुलकिडे, पांढरी माशी हजारोंच्या संख्येने सापडून मेल्या आहेत. त्यामुळे कोळी यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती देत कृषी विभागातील कृषी मित्र, कृषी सहायक, कृषीपर्यवेक्षक यांच्यामार्फत या सापळ्याचा वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
सुलभ मॉडेल विकसित
अमावास्येच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीचा सुधारित सापळा मॉडेल विकसित करण्याचा कोळी यांचा मनोदय होता. २०१० मध्ये कऱ्हाड येथे याची सुरुवात केल्यानंतर त्यांना गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना या सुचंद्र प्रकाश सापळ्याचे तंत्रज्ञानाचे प्रसारित करण्याची गरज भासली म्हणून त्यांनी हे मॉडेल विकसित केलेले आहे. प्रभावी ठरलेल्या या प्रकाश सापळ्याच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ही काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांना वापरण्यासाठी चंद्रकांत कोळी यांनी प्रकाश सापळ्याचे सुलभ मॉडेल विकसित केले आहे.
सुचंद्र प्रकाश सापळा म्हणजे काय व तो कसा वापरावा?
- शेतकऱ्यांना शेतामध्ये सुलभ पद्धतीने वापरता येण्यासारखा बनवलेला आहे.
- पिकाची उंची वाढेल तसा खाली-वर सरकवता येतो.
- या प्रकाश सापळ्यास पिवळा रंग दिल्याने किडींच्या पतंगांना पिवळा रंग हा आकर्षित करतो.
- शेतामध्ये लाइटची सोय असल्यास किंवा नसल्यास दोन्ही ठिकाणी वापरता येईल.
- कंदील, लाइटपासून जवळच खाली घमेले मांडण्यात आले आहे. त्यामध्ये राॅकेल किंवा कीटकनाशकयुक्त पाणी ठेवण्याची सोय केलीली आहे.
- सुचंद्र प्रकाश सापळा तयार करण्यास २००० रुपये खर्च येतो. लोखंडी असल्याने किमान १५ वर्षे टिकेल.
- किडीचे पतंग विद्युत बल्ब, कंदील वर आदळून तोल जाऊन खाली असलेल्या रॉकेल, कीटकनाशक मिश्रित पाण्यात पडून मरतात. त्यामुळे किडींची उत्पत्ती थांबते.
- होणारे नुकसान टाळून रासायनिक कीटकनाशकावरील खर्च कमी होतो. उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविता येते.