लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने सर्वांना शिक्षणाचे अधिकार उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय शाळांना किलोमीटरचे निकषही घालून दिले आहेत. इंग्रजी माध्यमांबरोबर अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांना घरघर लागली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १०१४ आहेत. शासनाने एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळांना कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय निकषानुसार जिल्ह्यातील या शाळा बंद होऊ शकतात. मात्र जिल्हयातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा दुर्गम भागातील असल्याने त्यांना अभय मिळणार आहे.
सर्वशिक्षा अभियानाच्या निकषानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांना किमान एक किलोमीटर, तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळांना दोन ते तीन किलोमीटरचा निकष आहे. संबंधित किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या शाळांमध्ये ज्या शाळेची पटसंख्या अधिक आहे, तेथे कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचे समायोजन करण्यात येते. मात्र एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या बहुतांश शाळा दुर्गम भागामध्ये आहेत. समायोजनासाठी जवळपास शाळा नाही. त्यामुळे कमी पटसंख्या असतानाही, विशेष बाब म्हणून या शाळांचे समायोजन न करता त्या सुरूच ठेवण्यात येणार आहेत.
कोणत्याच शाळांचे समायोजन नाही
पटसंख्येअभावी जिल्ह्यातील काही शाळा बंद करण्यात आल्या असल्या, तरी एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद न करता, सुरूच ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ... शाळा नियमानुसार समायोजित होणे गरजेचे असताना, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शाळांचे समायोजन होणार नाही.
कोट :
शासन निर्णयानुसार शाळांचे समायोजन करणे क्रमप्राप्त आहे, मात्र दुर्गम भागातील शाळा असून, तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विशेष बाब म्हणून शाळा बंद न करता, सुरूच ठेवण्यात येणार आहेत. परिणामी जिल्ह्यातील १४१० शाळांमध्ये अध्यापन व शैक्षणिक कामकाज सुरू राहणार आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी
शिक्षकांनाही अभय
जिल्ह्यात ० ते १९ पटसंख्या असणाऱ्या १०१४ शाळा आहेत. शाळांचे समायोजन झाले, तर नियमानुसार शिक्षकांचेही समायोजन करावे लागते, मात्र शाळांमुळे शिक्षकांनाही अभय प्राप्त झाले आहे.
विद्यार्थ्यांची सोय
पटसंख्येच्या निकषानुसार १०१४ शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन क्रमप्राप्त होते. मात्र दुर्गम भागातील शाळा असल्याने व गावापासून अंतर अधिक असल्याने लहान मुलांना अन्य शाळेत जाण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. परिणामी शाळांचे समायोजन करण्याऐवजी त्या सुरूच ठेवल्या आहेत.