कातरखटाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्यावर होणारे कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी व महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी निर्भया पथकाद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, ‘महिलेला हक्काच्या मालमत्तेपासून वंचित करून तिला घराबाहेर काढले जाते. असे कौटुंबिक हिंसाचार सहन न करता, न घाबरता महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. आजमितीला खऱ्या अर्थाने तरुण मुली शिक्षणासाठी मोबाईलच्या प्रवाहात जादा वेळ घालवत आहेत. परंतु तरुणाई गुन्हेगारीच्या दिशेने वाळलेली दिसून येत आहे. तारुण्यात घडलेल्या चुका आणि फसवणुकीमुळे अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ज्या वयात विधायक दिशेने पाऊल पडायचे गरजेचे असते त्या वयात चुकीची पडू लागली आहेत. योग्य दिशा नसल्याने महिला, मुली गुन्हेगारीच्या विळख्यात अधिकच गुरफटलेली दिसत आहेत. यासाठी महिलांनी निर्भीडपणे पुढे आले पाहिजे.
अशावेळी महिलांची जबाबदारी महत्त्वाची आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुली, तरुणी अगदीच जाणत्या नसतात. त्यांच्या हातून घडलेल्या चुकांचा परिणाम त्यांच्यावर आयुष्यभर होत असतो. याची जाणीव त्यांना होत नसते. त्यामुळे महिलांनी निर्भीडपणे पुढे येणे गरजेचे आहे.’
यावेळी पोलीस पाटील घनश्याम पोरे, बचत गटातील महिलांची कार्यक्रमास उपस्थिती दिसून आली.