पुसेगाव : शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर यांच्यासह शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. महावितरण अधिकाऱ्यांची वागणूक उर्मट असून, पदाधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळेच उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला. जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणाऱ्या शिवसैनिकांवर जिवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे यासारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून जनतेसाठी झटणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा, असे मत कोरेगाव शिवसेना तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे यांनी व्यक्त केले.
पुसेगाव पोलीस स्टेशनला निवेदन देताना सचिन झांजुर्णे बोलत होते. यावेळी सातारा तालुका प्रमुख दत्ता नलवडे, कोरेगाव शहराध्यक्ष अक्षय बर्गे, वाहतूक सेनेचे सचिन जगताप, कोरेगाव उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सचिन झांजुर्णे म्हणाले, ‘शिवसेनेची बांधिलकी नागरिकांच्या प्रश्ना संबंधित आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी अधिकाऱ्यांनी नागरिकांशी अरेरावी करणे चुकीचे आहे. वीजपुरवठा खंडित करणे याला शिवसेनेचा विरोध नसून उडवाउडवीची उत्तरे देणे व कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित करणे याला शिवसेनेचा विरोध आहे. वसुली अधिकाऱ्यांच्या गाडीची काच शिवसैनिकांनी या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे फोडली. तरीसुद्धा इतर अनेक खोटे कलमे लावून जनतेसाठी कार्यरत असणाऱ्या शिवसैनिकांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करून शिवसैनिकांना न्याय द्यावा ही कोरेगाव शिवसेनेच्या वतीने मी मागणी करतो, असे सचिन झांजुर्णे म्हणाले.