सातारा : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा अन्यायकारक निर्णय झाला असताना निवडणूक आयोगाने धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचा घाट घातला असून जोपर्यंत आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, अशी मागणी ओबीसी जनमोर्चातर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात सातारा शहरात मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो रद्द करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अमर गायकवाड, प्रमोद क्षीरसागर, अशोक लोहार उपस्थित होते.
ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले असताना निवडणूक आयोगाने नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. ओबीसींना राजकारणातून हद्दपार करण्याचा कुटील डाव खेळण्यात आला आहे. ओबीसी समाजाला गाडण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. जनगणना केल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. जनगणना जातनिहाय झाली तर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळेल, शासनाने याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.