सातारा : पुसेसावळी, ता. खटाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा येथील पुरोगामी संघटनांच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवार दि. १० रोजी पुसेसावळी येथे रात्री काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दहा जण गंभीर जखमी झाले. तसेच दुकाने व इमारतींची जाळपोळ केली आहे. गेल्या तीन महिन्यांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांसंदर्भात पोलिसांनी हल्लेखोरांवर वेळीच कारवाई न केल्यामुळे हा हल्ला झाला आहे.सातारा जिल्हा सामाजिक सलोखा असणारा जिल्हा आहे. या घटनेमुळे जिल्ह्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर ॲड. वर्षा देशपांडे, विजय मांडके, ॲड. शैला जाधव, कैलास जाधव, अरीफ शेख, मिनाज सय्यद, विक्रांत पवार, अस्लम तडसरकर, बाळकृष्ण देसाई, गणेश भिसे, नारायण जावळीकर, संजय गाडे, बबनराव करडे, संदीप कांबळे, किशोर धुमाळ, विजय निकम, मोहब्बत हुसेन, बशीर पालकर, डॉ. दत्ताजीराव जाधव, ॲड. पायल गाडे आदींच्या सह्या आहेत.
पुसेसावळीतील घटनेचा निषेध; साताऱ्यात आज मूकमोर्चा, बंदचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:24 AM