रुग्णांची ससेहोलपट थांबविण्याची मागणी.
ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : औंधसह परिसरातील अनेक गावांना औंध ग्रामीण रुग्णालयाचा मोठा आधार आहे. येथे ३० बेडचे कोरोना सेंटरही सुरू आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ, सोयीसुविधा यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे. एकाच छताखाली सर्व चाचण्या झाल्यास कोरोना रुग्णांची होणारी धावपळ थांबणार आहे. यासाठी सर्व चाचण्या या रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.
औंध परिसरातील संशयित कोरोना रुग्णांना आरटीपीसीआरसाठी पुसेसावळी येथे जावे लागते. तिथेही प्रचंड गर्दी असते. तिथे काही घोटाळा झाला तर थेट खटाव गाठावे लागते. या ठिकाणी चाचणी केली जाते, मात्र संबंधित रुग्णाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. तसेच एचआरसीटी करण्यासाठी तर रुग्णाला थेट सातारा, कराड किंवा विटा या ठिकाणी जावे लागते. गोरगरीब, अशिक्षित लोकांना या टेस्टचा अर्थही कळत नाही. मात्र, या सर्व प्रक्रियेतून जायचे आहे एवढं त्यांना माहीत आहे व तिथे जाण्यासाठी रुग्णवाहिकादेखील भरमसाट पैसे घेत असल्याचे काहींनी सांगितले. खासगी वाहने शक्यतो येत नाहीत, त्यामुळे रोगापेक्षा रुग्णांचे मानसिक खच्चीकरण अधिक होत आहे.
औंध येथे ३० बेडचे कोरोना सेंटर सुरू आहे. तेही केवळ चार कर्मचाऱ्यांवरच अवलंबून आहे. वेळप्रसंगी येथील सुरक्षारक्षक मदत करतात. या सेंटरमध्ये कर्मचारी वाढविण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आता कोरोना सेंटर असूनसुद्धा चाचण्या करण्यात लोकांना होणारा त्रास थांबवावा, तसेच प्रशासनाने एकाच ठिकाणी सर्व चाचण्या उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा औंध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी दिला आहे.
===Photopath===
190521\img-20210519-wa0280.jpg
===Caption===
फोटो:-औंध ग्रामीण रुग्णालय