कºहाड : गेल्या पाच ते दहा वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या त्रिशंकू भागातील कार्वेनाका येथील सुमंगलनगरात मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झाल्या आहेत. या वाढलेल्या विविध असुविधा व समस्यांमुळे संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी मंगळवारी कºहाड पालिकेवर मोर्चा काढला. ‘आधी सुविधा द्या, मगच घरपट्टी मागा’ असे ठणकावत पालिका प्रशासनास मागण्यांचे निवेदनही दिले.
एकूण अठरा कॉलनींचा समावेश असलेल्या त्रिशंकू भागातील सुमंगलनगर ते बाराडबरी परिसरात आहे. त्यातील सुमंगलनगर येथे ९ कॉलन्या आहेत. मात्र, याठिकाणी रस्ते, पाणी यासह ड्रेनजच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून येथील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील शोषखड्ड्यांचे पाणी रस्त्यावर येत असल्याने याठिकाणी रोगराईचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. साथीच्या आजारांमुळे नागरिकांना याठिकाणी वास्तव्य करणेही धोकादायक बनले आहे.
डेंग्यु, चिकुनगुनिया यासारख्या आजाराची या भागात साथ वाढली असल्याने या ठिकाणी पालिकेच्या वतीने कीटकनाशकांची फवारणी करण्यात यावी, अशी मागणीही येथील नागरिकांनी अनेकवेळा पालिकेकडे केली होती. मात्र, त्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष केले गेल्याने नागरिकांमध्ये पालिकेबाबत नाराजी निर्माण झाली आहे. मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येबाबत लवकरात लवकर उपाययोजना कराव्या, अशा विविध मागण्या अनेकवेळा करूनही पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. पालिकेने या भागातील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, जोपर्यंत येथील समस्या मार्गी लावल्या जात नाहीत. तोपर्यंत घरपट्टी भरणार नाही, असा पवित्रा घेत संतप्त झालेल्या सुमंगलनगरमधील नागरिकांनी पालिके वर मोर्चा काढला. मोर्चामध्ये सुमंगलनगरमधील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.