लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे आणि लसीकरण करणे यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. हा ताण टाळण्यासाठी शासनाने लस देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा द्यावी, अशा आशयाचा ठराव आरोग्य समिती सभेत करण्यात आला तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत सीसीटीव्ही बसविणे व फायर ऑडिटचाही निर्णय झाला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीची मासिक सभा उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सदस्य मनोज पवार, बापूराव जाधव, सागर शिवदास, शारदा ननावरे, अर्चना रांजणे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य समितीच्या मासिक सभेत मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला तसेच शासन परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर कोरोना विषयावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागावर नागरिकांना कोरोना लस देण्याचीही जबाबदारी आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. यासाठी जिल्ह्यातील कोरोना लसीसाठी स्वतंत्र यंत्रणा द्यावी यासाठी शासनाकडे मागणी करण्याचा विचार पुढे आला. त्याप्रमाणे सदस्यांनी ठरावही घेतला. आढाव्यादरम्यान, जिल्ह्यात कोरोना लस कमी पडणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लसीचे ६० हजार डोस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. कोरोना लसीचा हा साठा तीन दिवस पुरू शकतो.
जिल्ह्यात ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला. यासाठी १३ लाख रुपये खर्च येणार असून, तो जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित आहे. या निधीची तरतूद जिल्हा नियोजन मंडळातून करण्यात येणार आहे.
चौकट :
जिल्हा परिषदेतील दवाखाना सुरू होणार...
जिल्हा परिषदेत आरोग्य विभागामार्फत दवाखाना सुरू होता. या ठिकाणी कर्मचारी जाऊन वैद्यकीय सेवा घेत होते. पण अनेक महिन्यांपासून दवाखाना बंद आहे. कर्मचाऱ्यांसाठी हा दवाखाना सुरू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.
.............................................................