वाई : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ग्रामीण भागात वाढती रुग्णांची संख्या या पार्श्वभूमीवर पंचायत समितीची ऑनलाइन मिटिंग १० मे रोजी सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, गट विकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, सदस्य अनिल जगताप, मधुकर भोसले, दीपक ननावरे आदींच्या उपस्थितीत पार पडली.
सभेमध्ये तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांनी तालुक्यातील सध्यस्थितीबाबत एकूण रुग्णसंख्या, एकूण मृत्यूचे प्रमाण याबाबतची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील कोरोना संदर्भात संपूर्ण आढावा दिला. सद्य:स्थितीत कोरोना प्रतिबंधक विविध उपाययोजनांसंदर्भात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी औषधांची खरेदी, पल्स ऑक्सिमीटर आदी उपकरणे खरेदीसाठी निधीची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे यांनी तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावासंदर्भात गंभीर परिस्थितीचा विचार करता तातडीने निधी उपलब्ध करणेबाबत सूचना केल्या आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या पंचायत समिती सदस्य यांच्या गणातील मंजूर कामामधून प्रत्येकी १ लाख रकमेच्या निधीची तरतूद कमी करून एकूण ८ लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद आरोग्य विभागासाठी मंजूर करणेबाबत सुचविले व सदर निधी आरोग्य विभागास देणेबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच सदरची रक्कम आरोग्य विभागामार्फत आवश्यक असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी तातडीने ग्रामीण भागातील सुविधांसाठी खर्च करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी उपसभापती विक्रांत डोंगरे यांनी तालुक्यातील लसीकरणाबाबत आढावा घेतला. शासनाने गतीने लसीकरण करावे, असा ठराव जिल्हा परिषदेस पाठविण्याचा निर्णय घेतला.
पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे यांनी पंचायत समिती बावधन गणातील रुग्णवाढ व मृत्यूबाबत माहिती देऊन, प्रशासनास प्रतिबंधक उपाययोजनांची मागणी केली. या ऑनलाइन सभेस पंचायत समितीच्या सर्व खात्यांचे खातेप्रमुख व तालुका कृषी अधिकारी वाई यांची उपस्थिती होती.