वातावरणातील बदल विचारात घेऊन शासनाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानाचा एक घटक म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी येथील पालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. ८) सायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ढेबेवाडी फाटा येथून महारॅलीचा प्रारंभ करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महारॅली सुरू करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, शिक्षण व नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, इंद्रजित चव्हाण, नगरसवेक आनंदी शिंदे, गीतांजली पाटील, नंदा भोसले, कमल कुराडे, अलका जगदाळे, भारती पाटील, पूजा चव्हाण, आदींसह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी पर्यावरण संवर्धन व वसुंधरा संवर्धनाबाबत घोषवाक्य लिहिलेल्या फलकाद्वारे प्रदूषणमुक्त मलकापूरचा संदेश देण्यात आला. ढेबेवाडी फाटा येथून सुरू झालेल्या या रॅलीचे गणेश कॉलनीपासून ढेबेवाडी फाटा, संगम हॉटेल, मलकापूर फाटामार्गे लक्ष्मीनगर येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी सर्व सायकलस्वारांना ‘माझी वसुंधरा मित्र’ प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.
- चौकट
प्रत्येक महिन्यात नऊ तारखेला सायकल रॅली
या प्रसंगी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला शहरात सायकल रॅली आयोजित करून ‘प्रदूषणमुक्त मलकापूर’ करण्याचा संकल्प उपनगराध्यक्ष शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच लक्ष्मीनगर येथील वैकुंठभूमीत वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
फोटो : १०केआरडी०३
कॅप्शन : मलकापुरात पालिकेच्या वतीने आयोजित सायकल महारॅलीत शालेय विद्यार्थ्यांसह दोनशेवर सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. (छाया : माणिक डोंगरे)