लोकमत न्यूजनेटवर्कः
ढेबेवाडी : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी विविध उपाययोजना करूनही गावाभोवती कोरोनाचा विळखा घट्टच होत आहे. हा विळखा सोडविण्यासाठी पाटण तालुक्यातील कुंभारगावकरांनी आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यू पुकारला आहे. गावाला जोडणारा तळमावले कुंभारगाव रस्ताही बंद केल्याने गावातील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.
कुंभारगाव हे या विभागातील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. बारा वाड्या आणि एक गाव असे मोठ कार्यक्षेत्र असलेल्या गावात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाने आपला मुक्काम ठोकला आहे. तीन महिन्यांत ९८ बाधित रुग्ण येथे आढळले, तर आठजणांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाला हरविण्यासाठी ग्रामपंचायत, दक्षता समिती, आरोग्य विभाग यांनी विविध उपाययोजना राबविल्या तरीही या गावाभोवती कोरोनाचा विळखा घट्ट केला आहे. यावर काय उपाययोजना करायची यासाठी बैठक पार पडली. त्यामध्ये जनता कर्फूचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार बाजारपेठेतील सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ यांना याबाबत माहिती देण्यात आली. केवळ औषध दुकाने, दवाखाने, आणि दूध विक्री सुरू राहणार आहे, तर गावाकडे येणारा तळमावले रस्ताही बंद करण्यात आला आहे. यामुळे नेहमीच गजबजलेली बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कठ्ठे सुनेसुने दिसत आहेत. कोरोना साखळी तोडण्यासाठी सरपंच सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, पोलीस पाटील अमित शिंदे यांच्यासह आरोग्य विभाग योगदान देत आहे.
कोट-
कोरोनाशी लढण्यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग सर्व पर्याय करत आहे. मात्र, ही साखळी तोडण्यात अपेक्षित यश मिळाले नाही म्हणूनच आता जनता कर्फ्यू हा पर्याय निवडला. यासाठी ग्रामस्थही सहकार्य करीत आहेत, त्यामुळे गाव लवकरच कोरोनामुक्त होईल.
- सारिका पाटणकर,
सरपंच कुंभारगाव.