ओगलेवाडी : ओगलेवाडी आणि परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढीची साखळी तोडणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन काही निर्णय घेणे गरजेचे होते, म्हणून हजारमाची ग्रामस्तरीय कोविड १९ दक्षता समितीने खबरदारीचा उपाय म्हणून दि. २० आणि २१ एप्रिल रोजी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व व्यापारी व रहिवाशांनी या जनता कर्फ्यूमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारमाची आणि ओगलेवाडी गावात मागील काही दिवसांपासून रोज सुमारे १० रुग्ण आढळून येत आहेत. सुमारे ४१ बाधित गावात आहेत. या वाढीने गंभीर परिस्थितीचा सामना गाव करीत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्तरीय कोविड दक्षता समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्या घाबडे होत्या. यावेळी तलाठी श्रीकृष्ण मर्ढेकर, उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर, कल्याणराव डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ओगलेवाडी ही या भागातील गावांची प्रमुख बाजारपेठ आहे, तर इथली भाजी मंडईही खूप प्रसिद्ध आहे. शेतकरी शेतातील ताजा भाजीपाला थेट विक्रीसाठी या मंडईमध्ये घेऊन येत असल्यामुळे येथे खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मागील काही दिवसांपासून येथे सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात धुणे, एकाच ठिकाणी गर्दी करू नये अशा सूचना ध्वनिक्षेपकावरून देण्यात येणार आहेत. जनजागृतीबरोबरच नियम न पाळणारे व्यापारी व व्यावसायिकांविरोधात दंडात्मक कार्यवाही करून दुकान सील केले जाणार आहे.
या बैठकीला अवधूत डुबल, जगन्नाथ काळे, शरद कदम, पितांबर गुरव, विनोद डुबल, सीता माने, सारिका लिमकर, संगीता डुबल, ऐश्वर्या वाघमारे, दीपक लिमकर, पराग रामुगडे, सतीश जांभळे, धनाजी माने, संजय लिमकर आदी उपस्थित होते.