कोपर्डे हवेली : बनवडीसह परिसरात काही दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णवाढीची साखळी तोडणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन काही निर्णय घेणे गरजेचे होते. म्हणून बनवडी ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीने खबरदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व व्यापारी व रहिवासी यांच्या माध्यमातून ५ ते ९ मे दरम्यान हा कडक जनता कर्फ्यू राबवण्यात येणार आहे.
बनवडी व आजूबाजूच्या गावांत मागील काही दिवसांपासून रोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. या वाढीने गंभीर परिस्थितीचा सामना गाव करीत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्तरीय दक्षता समितीने बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, तलाठी संजय सावंत, ग्रामसेवक दीपक हिनुकले उपस्थित होते.
बनवडी कऱ्हाडपासून जवळ आहे. तसेच बनवडीचा काही भाग विद्यानगरमध्ये मोडतो. या ठिकाणी महाविद्यालय आहेत. बनवडी हे निमशहरी असल्याने याठिकाणी तरंगती लोकसंख्या जास्त असते. मागील काही दिवस येथे सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकावरून मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात धुणे, एका ठिकाणी गर्दी करू नये अशा सूचना देण्यात येत आहेत. जनजागृतीबरोबरच नियम न पाळणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांविरोधात दंडात्मक कार्यवाही करून दुकान सील केले जाणार आहे.
फोटो : मेलवर आला आहे.
बनवडी येथील जनता कर्फ्यूची पाहणी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले यांनी केली.