लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण तालुक्यातील गोखळी येथे कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी गोखळी ग्रामपंचायत व तरुणांनी एकत्र येऊन वीस बेड असलेला विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. ग्रामपंचायतीची नवीन इमारत व प्राथामिक शाळेत हा कक्ष सुरू असून, ग्रामस्थ व तरुणांनी कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे.
फलटण शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच थांबत आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्य व इतर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गावातच विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय ग्रामस्थ व तरुणांकडून घेण्यात आला. यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. यानंतर कोणी वस्तू रूपाने तर कोणी आर्थिक स्वरूपात मदत दिली अन् गावात विलगीकरण कक्ष सुरू झाला. गावात बाहेरून आलेल्या व्यक्तीवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. गावात कोणाला लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी केली जात आहे.
डॉ. शिवाजी गावडे, डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ, विकास खटके, गोखळी आरोग्य उपकेंद्र्राच्या वैद्यकीय अधिकारी सानिया शेख, आरोग्य सेविका लोंढे, आशा सेविका दुर्गा आडके या डॉक्टरांचे पथक कोरोना ग्रस्तांवर बारकाईन लक्ष ठेवून आहे. सोमनाथ वायसे, गोरख हरीहर हे मोफत रक्त तपासणी करीत आहेत. गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे हे रुग्णांना औषधे उपलब्ध करीत आहेत. दीपक चव्हाण यांनी कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना पिण्याचे कोमट पाणी आणि अंघोळीसाठी गरम पाण्यासाठी गॅस शेगडीची व्यवस्था केली आहे.
फोटो : १६ फलटण फोटो
फलटण तालुक्यातील गोखळी येथे वैद्यकीय पथकाकडून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.