सातारा : लोकसभेची पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी प्रचाराचा जोरदार धुरळा उडवून दिला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शनिवारी (दि. १९) सायंकाळी पाचनंतर जाहीर प्रचार थांबणार आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याचे बुरूज फोडण्याचे काम भाजप व शिवसेनेने केले. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. तर शिवसेनेचा केवळ एक आमदार आहे. तरीदेखील भाजपने जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादी व काँगे्रसमधील तगड्या उमेदवारांना आपल्याकडे घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची खेळी भाजप व शिवसेनेने खेळली आहे.
जिल्ह्यातील राजकारणात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी लक्ष घातलेले आहे. उदयनराजे भोसले व विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यात जाहीर सभा घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी क-हाडला जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माण विधानसभेचे उमेदवार जयकुमार गोरे व फलटणचे उमेदवार दिगंबर आगवणे यांच्यासाठी दोन जाहीर सभा घेतल्या. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पाटण येथे आमदार शंभूराज देसाई यांच्यासाठी पाटण येथे जाहीर सभा घेतली. तसेच रहिमतपूर येथे कºहाड उत्तरचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दोन जाहीर सभांचे आयोजन साता-यात केले.
महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. जाहीर सभा, प्रचार रॅली, कोपरा सभा, गृहभेटी, प्रभागफे-या तसेच प्रचारांच्या वाहनांमुळे जिल्ह्यात भलतेच वातावरण तापले आहे. आता शनिवारी सायंकाळी पाच वाजता हा जाहीर प्रचार थांबणार आहे. आजपासून रात्रंदिवस छुपा प्रचार सुरू होणार आहे.