सातारा : बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी आरडाओरड आणि शिवीगाळ करणाऱ्या त्याचबरोबर पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या चौघांची सोमवारी मध्यरात्री प्रवाशांनी चांगलीच धुलाई केली. यावेळी या चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना जमावानेच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर रूपेश चौधरी, मनोज पवार, सूरज सोडमिसे, नरेंद्र बर्गे यांना अटक केली. या चौघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे आणि बसस्थानक पोलीस चौकीतून मिळालेली माहिती अशी की, सोमवार, दि. १७ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सातारा बसस्थानकात दोन गटांत किरकोळ बाचाबाची झाली. याचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी पोलिसांनी दोन्ही गटांच्या युवकांना येथून हाकलून लावले. यानंतर युवकांचे दोन्ही गट येथून निघून गेले. दरम्यान, या मारहाणीत सहभागी असणारा नरेंद्र रवींद्र बर्गे (पत्ता समजू शकला नाही) हा रविवार पेठेतील रूपेश दशरथ चौधरी (वय २५), मनोज नामदेव पवार (२५), सूरज पांडुरंग सोडमिसे (वय २१, सर्व रा. रविवार पेठ) या तिघांना घेऊन पुन्हा बसस्थानकात आला.या चौघांनी येथे आल्यानंतर जोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या गटातील युवकांना शिवीगाळ सुरू केली. मात्र, यावेळी दुसऱ्या गटाचे येथे कोणी नव्हते. या चौघांचा आरडाओरडा वाढू लागल्यामुळे त्याचा प्रवाशांना त्रास होऊ लागला. काही प्रवासी चक्क संतापले. याचवेळी एक पोलीस कर्मचारी त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यालाही धक्काबुक्की झाली. यामुळे तर प्रवासी आणखी संतापले आणि त्यांनी या चौघांची तुफान धुलाई केली. येथे त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता, बसस्थानक पोलीस चौकीतील एक हवालदार त्यांना समजावण्यासाठी गेला असता त्यालाच धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना सुरू असतानाच संतापलेल्या प्रवाशांनी या चौघांनाही बेदम मारहाण करत चांगलीच धुलाई केली. ही मारहाण इतकी बेदम होती की चौघांनाही काहीच सुचत नव्हते. यापैकी दोघे पळून जाऊन बाजूला थांबले; मात्र त्यांनाही पुन्हा पकडले आणि धुलाई सुरू केली. यानंतर या चौघांनाही बसस्थानक चौकीत असणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. एन. बुरसे करत आहेत. (प्रतिनिधी)दगड उचलल्यांनतर जमाव संतप्तसातारा बसस्थानकात रूपेश चौधरी, मनोज पवार, सूरज सोडमिसे, नरेंद्र बर्गे शिवीगाळ आणि आरडाओरडा करत असतानाच संतापलेले बसस्थनाकात असणाऱ्या चौकीतील एक पोलीस कर्मचारी त्यांना तेथून हुसकावून लावण्यास गेला. मात्र, यापैकी एकाने हातातील दगड पोलीस कर्मचाऱ्यावर उगारला. यामुळे जमाव आणखी संतापला आणि या चौघांची यथेच्छ धुलाई झाली.
फाळकूटदादांची धुलाई
By admin | Published: November 19, 2014 9:52 PM