कोयनानगर : पाटण तालुक्यात गत आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून महसूल कर्मचारी थेट शेताच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहेत.
पाटण तालुक्यात १७ जूनला रात्रभर झालेल्या पावसाने बहुतांश भाग झोडपून काढला. या पावसाने अनेक ठिकाणी ओढे, नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने शेताचे बांध, उंच ताली ढासळल्या असून मोठ्या प्रमाणात मातीही वाहून गेली आहे. शेतात दगड, गोटे पसरले आहेत. अतिप्रमाणात शेतात पाणी झाल्यामुळे नुकतेच पेरलेले बियाणेही वाहून गेले. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभाग, कृषी विभाग व पंचायत समितीचे कर्मचारी करत आहेत. संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांसोबत थेट शेताच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
गत काही वर्षांपासून तालुक्यात महापूर, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि कोरोनाने ग्रासलेल्या बळिराजाला पुन्हा अतिवृष्टीने पुरते गारद केले आहे. शासनाने तुटपुंजी मदत न करता यातून सावरण्यासाठी भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
फोटो : २३केआरडी०३
कॅप्शन : बनपेठ (ता. पाटण) येथील शेती नुकसानीचा पंचनामा तलाठी ए. व्ही. घाडगे, सरपंच आबासाहेब साळुंखे, धनराज साळुंखे यांनी केला.