मलकापूर : मलकापुरात विनामास्क, तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणाऱ्या ८ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करीत ८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांसह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सोमवारी दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली.
सध्या शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही शहरातील अनेक दुकानांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने मलकापूर नगरपालिकेसह पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाईची धडक मोहीम राबवली. सोमवारी पोलिसांसह पालिकेच्या विशेष पथकाने कारवाईचा बडगा उगारला. शहरातील मोठ्या व्यावसायिकांसह ८ दुकानांवर दंडाची कारवाई केली. त्यांच्याकडून ८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
शिवछावा चौक, आगाशिवनगर परिसरात विनामास्क व दुकानांत गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. सोमवारी दिवसभर ही विशेष मोहीम सुरू होती. पोलीस व नगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने मुख्य बाजारपेठेत राबविलेल्या या कारवाईच्या मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
चौकट
दुसऱ्यांदा सापडल्यास दुकाने सील
मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली. राजेश काळे यांना स्वतः काही दुकाने दुसऱ्यांदा सापडल्यामुळे सील करण्याची कारवाई केली.
फोटो -
मलकापुरात पोलिसांसह पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांसह दुकानांमध्ये गर्दी करणाऱ्या व्यावसायिकांवर धडक दंडात्मक कारवाई केली. (छाया - माणिक डोंगरे)