पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड व अवकाळी ग्रामपंचायत कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आखत आहेत. दोन्ही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लिंगमळा धबधबा पॉइंट व केट्स पॉइंट येथे प्रत्यक्ष जाऊन स्वतः ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी व पोलिसांना बरोबर घेऊन मास्क न वापरणाऱ्या पर्यटक व ग्रामस्थांना दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, याबाबतची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येत आहे.
याचाच परिणाम म्हणून जवळपास दुसऱ्या दिवशीपासून शंभर टक्के पर्यटक व ग्रामस्थ मास्क वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याचा प्रचार सर्वत्र झाल्याने याबाबत पर्यटक व ग्रामस्थांनी धसका घेतला आहे. सध्या कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा काम सुरू केले आहे.