खटाव : कोरोनाचे वाढते संक्रमण तसेच कोरोनाचा प्रसार कमी व्हावा, यासाठी सातारा जिल्ह्यात १० तारखेपर्यंत अधिक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातही खटावमध्ये दुकाने उघडी करून वस्तूंची विक्री करत असलेल्या दोन व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत १० तारखेपर्यंत सील करण्यात आली.
खटावमध्ये काही ठिकाणी या निर्बंधांचे उल्लंघन करून नियम मोडणाऱ्यांवर आता पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व कर्मचारी पोलिसांची करडी नजर असून, त्या ठिकाणी जाऊन संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
खटावमध्ये पुसेगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मनोजकुमार दोशी तसेच रमणलाल दोशी यांचे किराणा दुकान १० तारखेपर्यंत सील करण्यात आले व प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
ग्रामपंचायत व पोलीस चौकीच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोजकुमार दोशी या दुकानदाराला वारंवार समज देऊनसुद्धा राजरोसपणे दुकान उघडून ग्राहकांना विक्री करत असताना ही कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या नियमाला केराची टोपली दाखवून दुकान उघडत असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनच्या वतीने कडक कारवाई करण्यात येत आहे.
विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवरदेखील पोलिसांची नजर असल्यामुळे व दंडात्मक कारवाई होईल, या भीतीमुळे नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरदेखील त्यामुळे वर्दळ कमी दिसत आहे.
०७खटाव
कॅप्शन : खटाव येथे मनोजकुमार दोशी, रमणलाल दोशी यांचे दुकान सील करून दंडात्मक कारवाई करताना पुसेगाव स्टेशन पोलीस, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख आधी उपस्थित होते.