भाजीविक्रेत्यांवर
दंडात्मक कारवाई
सातारा : संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक भाजीविक्रेते शहरात भाजीविक्री करताना दिसून येत आहेत. हा प्रकार कोरोना संक्रमणाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांनी शासन नियमांचे काटेकोर पालन करावे, कोणीही लपूनछपून भाजीविक्री करू नये. असे करताना आढळल्यास संबंधितांवर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सातारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नगरपालिकेकडून
नाल्यांची स्वच्छता
सातारा : सातारा पालिकेकडून ओढे-नाले स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. सोमवारी दिवसभर आरोग्य पथकाकडून केसरकर पेठ, माची पेठ, शनिवार पेठ परिसरात नाल्यांची स्वच्छता सुरू होती. याशिवाय प्रत्येक प्रभागात निर्जंतुकीकरण मोहीम व धूरफवारणी केली जात आहे. दाट लोकवस्तीचा परिसर असलेल्या सदर बाजार व लक्ष्मी टेकडीकडे आरोग्य विभागाने विशेष लक्ष दिले आहे.
गुरुवार परजावरील
रस्त्यावर पुन्हा खड्डे
सातारा : येथील गुरुवार परज परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे पालिकेकडून काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्यांची अवस्था पूर्वीप्रमाणेच होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यावरील खडीदेखील उखडली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने अंतर्गत रस्त्यांची प्राधान्याने डागडुजी करावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.
अजिंक्यताऱ्यावर
तरुणांची भटकंती
सातारा : संचारबंदी असतानाही साताऱ्यातील अजिंक्यतारा व चार भिंती परिसरात भटकंतीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. सायंकाळ होताच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीमधील अनेक तरुण तसेच वयोवृध्द व्यक्ती भटकंतीसाठी घराबाहेर पडत आहेत. संचारबंदीच्या कालावधीत पोलिसांकडून केवळ एकदाच किल्ल्यावर येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा एकही कारवाई न झाल्याने नागरिक तसेच तरुण किल्ल्यावर निर्धास्तपणे वावरू लागले आहेत.