भुईंज : राजकारणात काही खरं नसतं... हे खरं असलं तरी, राजकीय नेत्यांची मैत्री ही राजकारणापलीकडची असते, याचा अनुभव अनेकदा आला आहे. अनेकांच्या विवाहात आणि घरगुती कार्यक्रमात राजकीय नेत्यांची ही उपस्थिती राजकारणापलीकडचे नाते सांगून जाते. अशीच मैत्री सध्याचे पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांची. बनवारीलाल पुरोहित यांनी आज, शुक्रवारी अचानक प्रतापराव भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन जुन्या मैत्रीला उजाळा दिला.राज्यपाल पुरोहित यांनी यापूर्वी तामिळनाडू, आसाम, मेघालयाचे राज्यपाल म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. तत्पूर्वी नागपूर लोकसभा मतदार संघातून ते ३ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्याचदरम्यान प्रतापराव भोसले हेही संसदसदस्य होते. त्यादरम्यान या दोघा नेत्यांमध्ये निर्माण झालेला स्नेह, मैत्री पुढे कायम राहिली. त्याच स्नेह, मैत्रीला उजाळा देण्यासाठी राज्यपाल पुरोहित हे आपल्या व्यस्त कारभारातून वेळ काढून प्रतापराव भाऊंना भेटण्यासाठी आवर्जून आले.या भेटीत अनेक आठवणी, तत्कालीन राजकीय घडामोडी यावर चर्चा करत या दोघा मित्रांच्या चांगल्याच दिलखुलास गप्पा रंगल्या. राज्यपालांनी आवर्जून आणलेली पंजाबची पारंपरिक शाल, पुष्पगुच्छ भाऊंना भेट दिला. दोघांनीही परस्परांना तब्येतीची काळजी घ्या, असे बजावून निरोप घेतला. यावेळी मदन भोसले, मोहन भोसले, गजानन भोसले, केतन भोसले, सुरभी भोसले, यशराज भोसले हे उपस्थित होते.
पंजाबचे राज्यपाल पुरोहितांनी जपली राजकारणापलीकडची मैत्री, प्रतापराव भोसलेंची भेट घेत दिला मैत्रीला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 2:44 PM