सातारा : शाहूपुरी येथे काही दिवसांपूर्वी एका अपघातात माकडाच्या पिल्लाला रिक्षाने ठोकरले. त्यानंतर या परिसरात बहुतांश प्रवासी रिक्षावर माकड हल्ला करत असल्याचे नागरिकांनी पाहिले. माकडाच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पिल्लासाठी असणारा माकडाचा हा प्रतिशोध संपणार कसा? त्याला होणाऱ्या त्रासातून नेमकं कसं मुक्त केलं जाणार असा प्रश्न शाहूपुरी वासियांना भेडसावत आहे.
दरम्यान, येत्या काळात त्याच्याकडून अन्य कोणावर हल्ले होऊ नयेत यासाठी वनविभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले. उपद्रवी माकडाच्या त्रासातून आमची मुक्तता करा अशी मागणी भारत भोसले यांनी उपवनसंरक्षक अधिकारी सातारा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपद्रवी माकडाच्या वागणुकीने शाहूपुरी वासीय एकाबाजूला त्रस्त झाले असले तरी ते माकड असे का वागत आहे याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय याबद्दल नागरिकांच्यात उत्सुकता लागली आहे.
दुसऱ्या बाजूला माकडाच्या उचापती वाढू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर कंटाळून शाहूपुरी वासीयांकडून त्याचा बंदोबस्त करून त्याला जंगलात सोडावे अशी विनंती करण्या सोबत भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेला आळा घालण्याची मागणी देखील भोसले यांनी उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज यांच्याकडे केली आहे.
काॅलनीत धास्ती..नागरिकांना काळजीशाहूपुरी अंतर्गत जिल्हा परिषद कॉलनी, खटावकर कॉलनी, धर्मवीर संभाजी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एका माकडाने उच्छाद मांडला असून ते सातत्याने येणाऱ्या, जाणाऱ्या लहान मुले, महिला व अबालवृद्ध नागरिकांना त्रास देत आहे. तसेच मागील दोन दिवसांपूर्वी दूध व्यावसायिक राजेंद्र केंडे व नुकतंच नगरपालिका घंटागाडी वरील एका कर्मचाऱ्यास माकडाने चावा घेतला आहे. यामध्ये त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या दोन रिक्षाचे हूड देखील माकडाने फाडली आहेत. यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे माकड नर का मादी अजून समजू शकले नाही.
गेल्या काही दिवसांपासून माकडाने शाहूपुरी परिसरात उच्छाद मांडला आहे. अन्नाच्या शोधात येणाऱ्या माकडांची सवय स्थानिकांना होती. पण अचानक होणाऱ्या माकडांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या नागरिकांच्या काळजीसाठी या माकडाचा बंदोबस्त करण्यात यावा. - भारत भोसले, रहिवासी