सातारा : झाडाणी येथील ६२० एकर जमीन खरेदी प्रकरणाची सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरु आहे. गत सुनावणीवेळी चंद्रकांत वळवी यांनी वकीलामार्फत कारवाही करण्याची विनंती केली होती. मात्र, अप्पर जिल्हाधिकारी यांनी ती फेटाळात ३ जुलैला स्वत: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी चंद्रकांत वळवी नातेवाईकांसह उपस्थित राहिले. मात्र, अप्पर जिल्हाधिकारी मिटींगसाठी मुंबईला गेल्याने आता ११ जुलै ही सुनावणीची पुढील तारीख देण्यात आली आहे. तर सरकारी कारवाई सुरु असल्याने त्याला सहकार्य करु असे मत वळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथे गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत बळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुमारे ६२० एकर जमीन खरेदी केली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकाम आणि कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर याबाबतची सुनावणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे. यासाठी आयुक्त चंद्रकांत वळवी, त्यांच्या पत्नी अनिल वसावे, त्यांच्या पत्नी, पियुष बोंगीरवर आदी आठ जण उपस्थित होते.
महसूलमंत्र्यांच्या बैठकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना मुंबईला तातडीने जावे लागल्याने आज या प्रकरणावरील सुनावणी होऊ शकली नाही. आता यानंतर ११ जुलै ही सुनावणीची पुढील तारीख देण्यात आली असून त्यावेळी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे वळवी यांना सांगण्यात आले आहे.