सातारा : जावळी तालुक्यातील जमिनीची तोतया व्यक्ती उभी करुन खरेदी केल्याप्रकरणात मेढा पोलिसांनी चाैघांना अटक केली आहे. संबंधितांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंधारी, ता. जावळी येथील रामचंद्र विठ्ठल शेलार आणि लक्ष्मण रखमाजी शेलार यांच्या जमिनीचा खरेदी दस्त तोतया व्यक्ती उभा करुन करण्यात आला होता. मेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा दस्त झाला होता. याबाबत रामचंद्र शेलार यांनी मेढा पोलिस ठाण्यात जून २०२३ मध्ये दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान संशयितांकडे चाैकशी केल्यावर आणखी १० जणांची नावे निष्पन्न झाली. परंतु, दस्त करतेवेळी उभ्या केलेल्या तोतया व्यक्तींची माहिती मिळत नव्हती. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी तोतयापैकी संपत हरिबा कदम याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर इतर संशयितांची नावे स्पष्ट झाली. त्यामुळे याप्रकरणात रवींद्र पांडुरंग शेलार (रा. अंधारी) संतोष बंडू सावंत (रा. उंबरेवाडी, ता. जावळी) आणि विजय सदाशिव कदम आणि संपत हरिबा कदम (दोघेही रा. आपटी, ता. जावळी) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक फाैजदार विकास गंगावणे, हवालदार सनी कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.