लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘आमच्या कुटुंबावर हल्ला करायचा आणि आम्हाला संपवायचं, हा उदयनराजेंचा हेतू होता. सुरुचीवर जो काय प्रकार घडला, त्यानंतर पोलिसांची एकतर्फी कारवाई सुरू असल्याचे दिसत आहे. माझ्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, उदयनराजेंच्या एका कार्यकर्त्याला रात्री अटक करूनही सोडून देण्यात आले. याबद्दल मी अधिवेशन काळात पोलिसांवर हक्कभंग दाखल करणार आहे,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुचीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.उदयनराजेंचा कार्यकर्ता पंकज चव्हाण याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, काही लोकांनी फोन केल्यानंतर त्याला पोलिसांनी सोडून दिले. असा आरोप करत आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘प्रत्येकाला आपे्र घर प्रिय असतं. राजकारण ही वेगळी गोष्ट आहे. संघर्ष होतो, हे राजकारणात चालूच असतं. माझ्या घरावर जर कोणी हल्ला करत असेल तर मी काय त्यांच्या तोंडाकडं बघत बसायचं का? म्हणजे मी काय षंढाची भूमिका घ्यायची का? त्यांनी अर्वाच्य भाषेत शिव्या द्यायच्या. बंदूक काढ, मारून टाकू अशा धमक्या द्यायच्या. हे खपवून घेणार नाही. त्यांच्या गाड्या फुटल्या, संघर्ष झाला, वातावातरण तंग झालं. जे काय घडलं ते चुकीचं घडलं, हे मान्य आहे.
ज्यांचा इथं यायचा संबंध नव्हता,त्यांनी इथं का यावं. पोलिसांनी सांगितल्यानंतर मी आनेवाडी टोलनाक्यावर गेलो नाही. पोलिसांचा मान ठेवून कायद्याचा आदर राखला. मात्र, पोलिसांना उदयनराजेंना अडवता आले नाही. पोलिसांनी लावलेले बॅरिकेटस उदयनराजेंनी फेकून दिले. डीवायएसपींसारख्या अधिकाºयांना ढकलून दिलं. आम्ही ऐकतोम्हणून आम्हाला समजून सांगायचं. मात्र, जे पोलिसांनाही जुमानत नाहीत. त्यांना मात्र काहीच सांगायचंनाही. असा दुटप्पीपणा खपवून घेणार नाही.
‘पोलिस खाते खासदार उदयनराजे यांच्या दावणीला बांधल्यासारखे आहे. त्यामुळे एसपी साहेबांनी राजीनामा देऊन खासदारांना एसपी बनवावे तर अजिंक्य मोहितेला डीवायएसपी बनवावे,’ असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांना दिला.आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘खासदार उदयनराजेंकडे ३६ हजार एकर जमीन असल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. असे असताना त्यांना आनेवाड टोल नाक्याचा पुळका का आला आहे?पोलिसांनी केलेली ही कारवाई एकतर्फी आहे. रविवारपर्यंत पोलिसांनी योग्य निर्णय न घेतल्यास आम्ही स्वत: दोनशे कार्यकर्त्यांसह स्वत: अटक करून घेऊ. पुढे जे काही होईल त्याला पोलिसच जबाबदार राहतील.’ असाही इशाराही त्यांनी शेवटी दिला.पोलिसांवर हक्कभंग दाखल करणार..आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी आमदार आहे. आमदार म्हणून मलाही संविधानने अधिकार दिले आहेत. माझ्या घरात येऊन माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल पोलिस यंत्रणेने जी काय ढिलाई दाखविली आह, जे पोलिस अधिकारी यामध्ये आहेत, त्यांच्यावर अधिवेशनाच्या काळात हक्कभंग दाखल करण्याचा निर्णय मी घेतला आहे. माझ्या घरावर हल्ला होतो. माझ्याच कार्यकर्त्यांवर कारवाई होते. सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांनी पाहिले आहे. लोक माझ्या घरात येत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. फायरिंग झालं असं म्हटलं जातंय. आमच्या कोणाच्याही हातामध्ये काठ्या, सुरी, चाकू अशा कुठल्याही प्रकारचं शस्त्र सीसीटीव्हीत दिसत नाही. खासदारांनी इथ यायचं काही कारण नव्हतं. त्यांनी त्यांच्या घरी जायला हवं होतं. आमच्या घरी येण्याचं काहीही कारण नव्हतं. त्यांना काय आम्ही सत्यनारायणाच्या पूजचं निमंत्रण दिलं नव्हतं. आमच्या कुटुंबावर हल्ला करायचा आणि आम्हाला संपवायचं, हा त्यांचा हेतू होता. म्हणून विक्रम पवार यांच्यामागे ते सुरुचीपर्यंत आले. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिकार झाला. त्यांच्या गाड्या फुटल्या. साहजिकच आहे. माझ्या घरावर जर हल्ला होत असेल तर प्रतिकार करणं हे स्वभाविक आहे. तेव्हा माझा बचाव मीच केला पाहिजे. मी आमदार आहे म्हणून माझं घर उघड्यावर पडलं आहे का?शरद पवारांनी लक्ष घातलंयआनेवाडी टोलनाका आणि सुरुचीवर जो काय प्रकार घडला आह, त्याबाबत खासदार शरद पवार यांनी लक्ष घातलं आहे. त्यांनी दिल्लीवरून फोन करून या प्रकाराची माहिती घेतली आहे. तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे यांनीही आमचा तुम्हाला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.पोलिसांत हजर होण्याचा निर्णय चर्चेनंतरचएक-एक कार्यकर्ता अटक होण्यापेक्षा आम्ही दोनशेजण एकदमच अटक करून घेणार होतो. मग जे काय वातावरण होईल, त्याची जबाबदारी पोलिसांची राहिली असती, ही भूमिका आम्ही घेतली होती. मात्र, पोलिसांनी शहराच्या वातावरणाचा विचार करा, असं सांगितल्यामुळे हजर झालो नाही. उद्या हजर व्हायचं की नाही, हे घरात चर्चा करून निर्णय घेणार आहे, असेही ते म्हणाले.पोलिसांना आणखी काय पुरावे हवेत ?पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी स्वत:च्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. उदयनराजे यांच्या ताफ्यामध्ये असलेल्या गाडीने मला उडविले. माझा कार्यकर्ता रवी पवार याला उदयनराजेंच्या गाडीने उडविले. त्याने त्या गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे. आणखी काय पुरावे पोलिसांना हवे आहेत? असा प्रश्नही शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला.