प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील वाॅर्ड क्र ४ व ५ (पुसेगाव-बुध रस्ता ते भवानी नगरचा काही भाग) प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. वाॅर्ड क्र ६ (भवानी नगरचा पूर्व भाग ते करंजाळा, शासकीय विद्यानिकेतन व विठ्ठल नगर पर्यंतचा भाग) हा बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गावात इतर ठिकाणी ही बरेच रुग्ण कोरोना बाधित सापडल्याने वाॅर्ड क्र ३ (श्री सेवागिरी मंदिर ते पुसेगाव-बुध रस्ता उत्तर बाजू, बेघर, तोडकर व गोरे वस्तीसह) प्रतिबंधित क्षेत्र व वाॅर्ड क्र १ व २ (पुसेगाव-सातारा मेन रोडच्या दक्षिणेकडचा सर्व भाग) बफर झोन घोषित करण्यात आला आहे. वाॅर्ड क्र ६ प्रतिबंधित क्षेत्र तर लगतच असणारे वाॅर्ड क्र. १,२, व ५ हे बफर झोन जाहीर केले आहेत.
उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व कर्मचारी या भागात २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवणार आहेत. आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता अन्य व्यक्तींना या संबंधित क्षेत्राच्या परिसरात ये-जा करता येणार नाही. या भागात दूध, भाजीपाला, किराणा वस्तू घरपोच करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर या भागातील औषध दुकाने (मेडिकल), दवाखाने खुली राहणार आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी अविनाश फडतरे व त्यांचे सहकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, पुसेगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी नाळे यांनी पुसेगाव कोविड केअर सेंटरला शनिवारी भेट दिली. डॉ. प्रियांका पाटील व डॉ. आदित्य गुजर यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.