संजय पाटीलपुसेसावळी : जमावाने मारले, जाब कुणाला विचारणार आणि शासनाने झटकले तर दाद कुणाकडे मागणार, अशी पुसेसावळीतील जखमींची अवस्था आहे. दंगलीनंतर पाच दिवस हे जखमी रुग्णालयात पडून होते. मात्र, एकही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे फिरकला नाही. साधी विचारपूसही कुणी केली नाही. त्यामुळे जखमा भरल्या नसल्या तरी रुग्णालयाचे बिल भरून हे जखमी आता स्वगृही परतलेत. काहींच्या दोन्ही हातांना प्लास्टर करावे लागले, तर काही जणांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.पुसेसावळीतील हल्ल्यावेळी जमावाने प्रार्थनास्थळात घुसून मारहाण केली. या मारहाणीत नुरूल हसन शिकलगार या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सरफराज बागवान, समीर बागवान, बाबू शेख, इस्माईल बागवान, अखिल इनामदार, अल्ताफ बागवान, सोहेल बागवान, अमन बागवान, सैफअली बागवान, अब्दुल कादर मुल्ला, वसीम मुल्ला हे गंभीर जखमी झाले. या जखमींना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काहींची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना दोन दिवसांत घरी सोडण्यात आले.मात्र, सात ते आठ जण गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना दाखल करून घेऊन उपचार सुरू ठेवण्यात आले होते. पाच दिवस हे जखमी रुग्णालयातील बेडवर पडून होते. या कालावधीत त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या, तसेच पोलिसांकडून जाब-जबाबही नोंदविण्यात आले.रुग्णालयात असताना कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांनी त्या जखमींची काळजी घेतली. थोडीफार विचारपूस प्रशासनाकडूनही करण्यात आली. मात्र, एकही लोकप्रतिनिधी या जखमींकडे फिरकला नाही. त्यांना धीर दिला नाही, तसेच त्यांच्या उपचाराची जबाबदारीही स्वीकारली नाही. काही संबंध नसताना झालेल्या मारहाणीत रुग्णालयाचे बिल या जखमींच्या नावेच फाडण्यात आले. त्यामुळे उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाचे बिल भरून हे जखमी आता स्वगृही परतलेत. त्यांच्या शरीरावरील जखमा कालांतराने बऱ्या होतील; पण मारहाण, रुग्णालयातील दिवस आणि त्या घटनेच्या वेदना भरून येण्यास बराच कालावधी लागणार आहे.
कोणाचा हात मोडला, तर कोणाचे डोके फोडलेजमावाने लोखंडी झारा, दांडके आणि दगडाने मारहाण केली. त्यामुळे काही जणांना खोलवर जखमा झाल्या आहेत. या जखमांवर काहींना सात, तर काहींना दहा टाके घालण्यात आले आहेत, तसेच एकाच्या दोन्ही हातांना प्लास्टरही करण्यात आले आहे. मारहाण एवढी गंभीर होती की, जमावाने हाताला सापडेल त्या वस्तूने समोर येईल त्याला मारहाण केली. त्यामध्ये काही जणांच्या छातीला, तर काहींच्या डोक्यात मारहाण झाल्यामुळे त्यांचे एम.आर.आय., सी.टी. स्कॅन आदी तपासण्याही करण्यात आल्या आहेत.