पुसेसावळी : पुसेसावळी येथील दंगलीला आठ दिवस झाले असून, सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. या ठिकाणी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली, तसेच मृत नूरहसन शिकलगार यांच्या कुटुंबीयांची भेट घेत, विचारपूसही केली. त्यांनी दोषींवर कारवाई होईल, असेही स्पष्ट करत, कुटुंबीयांना दिलासा दिला, पण पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार अजूनही गावाकडे फिरकले नसल्याबद्दल ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली.खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे दि. १० सप्टेंबरच्या रात्री दोन गटांत वाद होऊन दंगल झाली होती. यामध्ये नूरहसन शिकलगार यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, काही दिवस गावात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला. या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुसेसावळीला भेट दिली होती, तर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. या दरम्यान, मृत नूरहसन शिकलगार यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. त्यांची पत्नी आणि आई यांच्याकडून घडलेल्या घटनेबद्दल माहिती घेतली.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे, हणमंतराव शिंदे, माजी सरपंच सुरेश पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रय रुद्रके, सरपंच सुरेखा माळवे, उपसरपंच डॉ.विजय कदम, रवी कदम, आशपाक एम.बागवान, मनान पठाण, मज्जिद नदाफ, समर आतार आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. पिढ्यान् पिढ्या या गावात हिंदू-मुस्लीम बांधवांत ऐक्य आहे. ते कायम राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर यापुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने सज्ज राहावे.’
एमआयएमच्या शिष्टमंडळाचीही भेट...मृत नूरहसन शिकलगार यांच्या कुटुंबीयांची एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनीही भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने मदत देण्यात आली, तसेच पुढील कायदेशीर लढ्यात आम्ही सर्व जण सोबत असल्याचे आश्वासनही दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफार कादरी, प्रदेश महासचिव अकिल मुजावर, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धम्मराज साळवे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख, उपाध्यक्ष दीपक कांबळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी आदी उपस्थित होते.