पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या जयघोषात बेलफुलाची उधळण करत मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात बुधवार, दि. २५ रोजी श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव झाला. यावेळी महाराष्टÑासह उत्तर कर्नाटक, गुजरात व इतर राज्यांमधील सुमारे आठ लाख भाविकांनी पुसेगाव सुवर्णनगरीत हजेरी लावली. सकाळी फुलांनी बहरलेला श्री सेवागिरींचा रथ दुपारनंतर नोटांच्या माळांनी पूर्णपणे झाकोळला होता.
मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेश जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगळवारी पहाटे श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक, मंत्रपुष्पांजली अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर भल्या पहाटे प्रारंभी फुलांनी सजवलेल्या मानाच्या रथात श्री सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निबाळकर, आ. महेश शिंदे, माजी आमदार शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराजांच्या रथाचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार अर्चना पाटील, सभापती कल्पना मोरे, किरण बर्गे, मानाजीकाका घाडगे, सरपंच मनीषा पाटोळे, उपसरपंच चंद्रकांत जाधवसह आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सुवर्णनगरीमध्ये आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने श्री सेवागिरी मंदिरात संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दरम्यान, मंदिरात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्यावतीने भक्तांना बुंदी प्रसादाचे मोफत वाटप करण्यात आले. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री सेवागिरी मंदिरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बैलबाजार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरोेग्य विभागाने मंदिर व यात्रा परिसरात चार वैद्यकीय पथके ठेवली होती. रथाभोवती तसेच दर्शनरांगेवर व गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर व स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली.
दहा तास रथाची मिरवणूक
- रथयात्रेस मंदिर ते यात्रास्थळ, पोस्ट कार्यालयमार्गे मंदिर अशी सुमारे दहा तास रथ मिरवणूक झाली. रथयात्रा संपल्यानंतर रथावरील देणगी रक्कम पोलीस बंदोबस्तात एकत्र करून श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेण्यात आली. येथील विविध बँकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनी या रक्कम मोजण्याचे काम सुरू केले. रात्री उशिरापर्यंत रक्कम मोजण्याचे काम सुरू होते.
- श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस बुधवारी सकाळी साडेदहा वाजता प्रत्यक्षात प्रारंभ झाला. यावेळी टाळमृदगांच्या गजरात ढोलताशे व बँडपथकाच्या निनादामुळे सर्व वातावरण सेवागिरीमय झालेले होते. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी पेढे व नोटांच्या माळा सेवागिरी माहाराजांच्या रथावर अर्पण केल्याने मानाचा रथ नोटांनी शृंगारला होता. रथाच्या उजव्या बाजूने भाविकांची जाण्याची व डाव्या बाजूने येण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.
- श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायत व सर्व प्रशासकीय विभागांकडून यात्रेकरूंना अधिकाधिक सोयीसुविधा पुरवल्या जात होत्या. पोलीस उपविभागीय अधिकारी सुहास गरूड व सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. रथाभोवती तसेच दर्शनरांगेवर व गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर व स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली.