चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात अत्यंत चुरशीने पार पडलेल्या सहा ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. हा निकाल मंत्री शंभूराज देसाई गटाला विचार करायला लावणारा आहे. पाटणकर गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींचा आकडा पाचवर पोहोचला असून मंत्री देसाई गटाला दोन ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे.
चाफळ विभागात आठ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या. सुरुवातीला यातील वाघजाईवाडी व विरेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध होत पाटणकर गटाच्या ताब्यात गेल्या. तर उर्वरित सहा ग्रामपंचायतींसाठी चुरस निर्माण झाली होती. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यानी आपली ताकद पणाला लावली होती. मंत्री देसाई गटाच्या ताब्यात असणाऱ्या शिंगणवाडी व केळोली ग्रामपंचायतीला खिंडार पाडत पाटणकर गटाच्या शिलेदारांनी सत्तापरिवर्तन घडविले आहे. माजी शिक्षण सभापती राजेश पवार यांचे जन्मगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंगणवाडी गावात पाटणकरांचे विश्वासू सहकारी शंकर पवार यांनी करिष्मा दाखवत मंत्री देसाई गटाला धक्का दिला.
विभागात पाटणकर गटाने सरशी केल्याने पाटणकर गटामध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तर मंत्री देसाई गट पिछाडीवर गेल्याने पदाधिकाऱ्यांना हा निकाल विचार करण्यास भाग पडणारा ठरला आहे. यापूर्वी आठपैकी पाच ग्रामपंचायती मंत्री देसाई गटाच्या ताब्यात होत्या. तर पाटणकर गटाकडे तीन ग्रामपंचायतींची सत्ता होती. शिंगणवाडी, केळोलीसह वाघजाईवाडी, कोचरेवाडी, विरेवाडी या पाच ग्रामपंचायती पाटणकर गटाकडे तर चव्हाणवाडी, खोणोली ग्रामपंचायतीवर मंत्री देसाई गटाची सत्ता आहे. पाठवडेत दोन्ही गटांचे समान उमेदवार विजयी झाले आहेत. येथील एका उमेदवाराबाबत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर येथील चित्र स्पष्ट होणार आहे.
- चौकट
देसाई-पाटणकर गटाचे बलाबल
वाघजाईवाडी : पाटणकर गट बिनविरोध
शिंगणवाडी : पाटणकर ३, देसाई २
चव्हाणवाडी : देसाई ३, पाटणकर २
केळोली : पाटणकर ४, देसाई ३
विरेवाडी : पाटणकर गट बिनविरोध
पाठवडे : देसाई ३, पाटणकर ३
कोचरेवाडी : पाटणकर ३, देसाई २
खोणोली : देसाई ५, पाटणकर ०
फोटो : १८केआरडी०२
कॅप्शन : चाफळ, ता. पाटण विभागातील केळोली ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.