म्हसवड : शिखर शिंगणापूर येथे दोन वर्षांपासून शिंगणापूर व परिसरात पुरेसा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसासाठी शिंगणापूरकरांनी श्री अमृतेश्वर (बळीदेवास) केलेली प्रार्थना फळाला आली. उत्तराचा पाऊस होऊन पुष्कर तलावात दहा टक्के पाणी आले. त्या संकल्पाची पूर्तता म्हणून पुष्करतीर्थाच्या नव्या पाण्याचे जलपूजन केले. त्या पाण्याने बळीदेवाच्या मंदिरातील गाभारा भरून पुरेशा पावसासाठी बळीराजाच्या सुखासाठी, भक्तांची व नागरिकांची पाणीटंचाई दूर व्हावी, अशी समस्त शिंगणापूर ग्रामस्थांनी प्रार्थना केली.याकामी शिंगणापूरमधील बहुसंख्य महिला, अभय मेनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे, माजी उपसरपंच संजय बडवे, मुकुंदराव बडवे, उल्हासराव बडवे, गावकामगार पोलीस पाटील संतोष बोराटे, ज्येष्ठ नागरिक जोतिराम राऊत, दीपक इनामदार, मधू महाराज, शामगिरी महाराज, मंगेश बडवे आदी उपस्थित होते.यंदा राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जीवित, वित्तहानी झाली. मात्र शिखर शिंगणापूर परिसरातील जनता अद्याप आभाळाकडे डोळे लावून राहिली आहे. उत्तरापर्यंतची सर्व पावसाळी नक्षत्रे कोरडी गेली. परिसरातील जलसाठे संपले आहेत. भाविकभक्त यात्रेकरूंसाठी मालोजीराजांनी बांधलेला पुष्कर तलाव कोरडा पडला होता.
शिंगणापूरकरांनी पावसासाठीचा संकल्प केला. उत्तरा नक्षत्राच्या पावसाने तलावात दहा टक्के पाणी आले. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचे वाजतगाजत पूजन करून स्वागत करण्यात आले. श्री शंभूमहादेवास पाणी घातले, बळीदेवाचा गाभारा पाण्याने भरून पुरेशा पावसासाठी प्रार्थना केली.