सातारा : शहराच्या पश्चिम भागात असणारे ऐतिहासिक मंगळवार व मोती तळे गणपती विसर्जनासाठी योग्य असून, या तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनास परवानगी मिळण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक कल्पनाराजे भोसले यांची भेट घेणार आहेत.
सातारा नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, नगरसेवक व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या बैठकीत विसर्जन तळे आणि वाहतूक मार्ग यावर साधारण दीड तास चर्चा झाली.
भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांनी माहिती अधिकाराच्या नावाखाली देवतांना वेठीस धरून सातारा शहराची अनेक वर्षांची परंपरा खंडित करणाऱ्यांवर टीकेची झोड उडवली. सिद्धी पवार यांनी मोती तळ्याचे वाटोळे झाले आहे. येत्या दहा दिवसांत तळी स्वच्छतेचा काय आकृतीबंध असणार आहे, याचा खुलासा मुख्याधिकाºयांनी करण्याची मागणी केली. शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व प्राची शहाणे यांनी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक तर एक खिडकी योजनेचे सुलभीकरण हे दोन मुद्दे मांडले.
माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गवळी यांनी सातारा गणेशोत्सवाचे पालकत्व घेणारी सातारा पालिका मध्यवर्ती गणेशोत्सवाची स्त्युत्य संकल्पना विसरल्याची खंत व्यक्त केली. मिरवणूक तसेच विसर्जन मिरवणुकांची कायमस्वरूपी व्यवस्था होण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सप्ततारा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू गोडसे यांनी गोडोली तळ्यात मूर्ती विसर्जनास विरोध दर्शवत कृत्रिम तळे निर्माण करण्यापेक्षा कायमस्वरूपी तळे निर्माण करण्याचा आग्रह धरला. माजी विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बाबर यांनी मंगळवार व मोती तळ्यांची स्वच्छता पाच लाखांत होते. तेथे विसर्जनास सातारकरांची काहीच तक्रार नाही. सातारा पालिकेने हा प्रश्न आपल्या पातळीवर सोडवावा, अशी विनंती केली.
अखेर नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कमिटी नेमून येत्या आठ दिवसांत तळ्याचा निर्णय अंतिम करणे, मंगळवार तळेच्या अंतिम परवानगीसाठी कल्पनाराजे भोसले यांची भेट घेणे अशी सूचना विरोधी पक्षनेते अशोक मोने व स्वीकृत नगरसेवक अॅड. दत्ता बनकर यांनी केली व त्याला सभागृहाने एकमताने मान्यता दिली.बाप्पा मोरयाचा जयघोषसातारा शहरातील गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. यंदा कृत्रिम तळ्यास जागा देण्यासाठी जिल्हा परिषदेने परवानगी नाकारल्यानंतर सातारकरांपुढे विसर्जनाचा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत पालिका प्रशासन, नगरसेवक व गणेश मंडळांमध्ये मंगळवार तळ्यावर एकमत झाल्याने सर्वांनी बाप्पा मोरयाच्या गजराने सभागृह दणाणले.