तरडगाव : तरडगाव (ता. फलटण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचे टोकन मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लागत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर काही वेळेस टोकन मिळालेल्या व्यक्तीदेखील लसीकरणापासून वंचित राहत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तरडगाव येथील आरोग्य केंद्र हे तालुक्यात मोठे समजले जाते. सध्या कोरोनास अटकाव म्हणून सर्वत्र लस जशी उपलब्ध होईल, त्यानुसार लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लसीचे महत्त्व आता सर्वांना समजू लागल्याने ठिकठिकाणी केंद्रांवर गर्दी होताना दिसते. शुक्रवारी तरडगाव केंद्रासाठी लसीचे दोनशे डोस उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच केंद्रावर एकच झुंबड उडाली.
यामध्ये दुसरा व पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे ५.३० वाजेपासून दूरवर रांगा लागल्या होत्या. सकाळी ९ वाजता टोकन वाटपास सुरुवात होणार होती. यामुळे सर्वांमध्ये कुजबुज सुरू झाली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दुसऱ्या डोससाठी आलेल्या व्यक्तींना ७.३० वाजता कुपन वाटप केले. त्यानंतर लोक घरी गेले. केंद्राचे कामकाज सुरू झाल्यावर लसीकरण सुरू झाले.
दुपारच्या सुमारास लसीकरण पूर्ण झाले असता टोकन मिळालेल्या काही चार ते पाच व्यक्ती केंद्रात आल्या. त्यांना डोस संपल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, टोकन असतानादेखील लस मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला, तर टोकन मिळालेल्या व्यक्तीने वेळेवर हजर राहावे. कारण लसीकरणादरम्यान इतर अन्य शासकीय व्यक्ती लस घ्यावयास आल्यास त्यांना ती द्यावी लागते, असे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.
(चौकट)
सूचना फलक आवश्यक
केंद्राच्या आवारात टोकन वाटपाची वेळ व लसीकरणाबाबतची माहिती याबाबत सूचना फलक लावणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांची गर्दी होऊन त्यांना पहाटेपासून ताटकळत बसावे लागणार नाही. संसर्गाचा धोका निर्माण होणार नाही, तसेच लसीच्या डोसचे प्रमाण हे कमी- जास्त न होता ते सर्वांना समप्रमाणात कसे देता येईल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.
फोटो -
फलटण तालुक्यातील तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर लसीकरणाचे टोकन प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे पहाटेपासून रांगा लागत आहेत. (सचिन गायकवाड)