सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्यासह सातारा जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा गतीने सुरू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ८७ हजार ८४६ नागरिकांनी कोरोना लस घेतली असून, यामध्ये ७१ हजार ४३३ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती होऊ लागल्याने आता सरकारी बरोबरच खासगी रुग्णालयांतही लसीकरणासाठी रांगा लागत आहेत.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच दि. १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला आहे. शासनाने जिल्ह्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांत लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
प्रारंभी ज्या नागरिकांनी आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी केली होती, अशा नागरिकांना सरकारी रुग्णालयात मोफत लस दिली जात होती. आता आधारकार्ड सोबत घेऊन येणाऱ्या कोमॉर्बिड व साठ वर्षांवरील व्यक्तीची लसीकरण केंद्रावर नोंदणी करून तातडीने लसही दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत असली तरी खासगी रुग्णालयात मात्र लसीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जात आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ८७ हजार ८४६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५ लाख १६ हजार ४१३ नागरिकांनी एक तर ७१ हजार ४३३ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
ज्या नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे, अशा एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. त्यामुळे नागरिक लसीकरणाला प्राधान्य देऊ लागले आहेत. शासकीय रुग्णालयात लसीचा तुटवडा भासू लागल्याने आता नागरिक खासगी रुग्णालयातही रांगा लावून लस घेत आहेत.
(चौकट)
पालिकेच्या रुग्णालयांनाही प्रतिसाद
सातारा पालिकेकडून कस्तुरबा रुग्णालय व गोडोली येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करण्यात आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ११ हजार ३८२ तर गोडोली आरोग्य केंद्रात ११ हजार ९९१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या दोन्ही केंद्रांवर दररोज सरासरी पाचशे नागरिकांना लस टोचली जात आहे.
(पॉइंटर)
लसीकरणाचा लेखाजोखा
एकूण लसीकरण : ५,८७,८४६
पहिला डोस : ५,१६,४१३
६० वर्षांवरील : २,३०,२९१
४५ वर्षांवरील : २,३८,२९१
१८ ते ३० वर्षांवरील फ्रंट लाईन वर्कर : १२,४७६
फोटो : जावेद खान