सातारा : ‘माणूसपण आणि विधायक सामर्थ्य व शक्तींना पुढे नेण्याचे काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व रा. ना. चव्हाण यांनी केले. आजच्या काळात त्यांच्या लेखनाचा अभ्यास करून भूमिका घेणे ही काळाची गरज आहे,’ असे उद्गार डॉ. बाबा आढाव यांनी काढले.वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने चव्हाण यांच्या २४ स्मृतिदिनी व जन्मशताब्दी वर्षात दिला जाणारा २१ वा ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ पुरस्कार यावर्षी १९८० नंतरच्या काळात मराठी भाषेतील वैचारिक साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे कृतिशील विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. बाबा आढाव बोलत होते.कार्यक्रमास प्रतिष्ठानचे विश्वस्त संभाजीराव पाटणे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, गौरी चौसाळकर, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, पणजीचे कॉ. रमेश कोलवाळकर, डॉ. अंजली जोशी, प्रा. डॉ. निशा भंडारे, रमेश चव्हाण, सतीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबा आढाव म्हणाले, ‘महर्षी शिंदे गेले तेव्हा मी १५ तर रा. ना. गेले तेव्हा ७५ वर्षांचा होतो. त्यांच्या हयातीत काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर सामाजिक स्वातंत्र्याचा प्रश्न उभा करण्याचे काम शिंदे यांनी केले. रा. ना. चव्हाण यांनी आंबेडकरांची वैचारिक जडणघडण स्वीकारली. आधाराशिवाय कोणतीही क्रांती यशस्वी होत नाही हे दाखवून दिले.’यावेळी प्रतिष्ठानला देणगी देणाऱ्या विविध व्यक्ती व संस्थांचा सत्कार बाबा आढाव यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात रमेश चव्हाण संपादित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ या रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजीराव पाटणे, रमेश चव्हाण, वैशाली चव्हाण, रमेश कोलवाळकर, निशा भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रियंका साबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) पुरस्कार म्हणजे विचारांचा गौरव : चौसाळकरसत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, ‘आज मिळालेला पुरस्कार हा मी विचारांचा गौरव समजतो. रा. ना. व महर्षींचे संबंंध गुरु-शिष्याचे होते. रा .ना. यांनी केलेले लेखन अभ्यासणे जरुरीचे आहे. मी ४० वर्षे त्यांचे लेख वाचत आहे. विद्यापीठातील चर्चासत्रात आल्याने त्याचे व माझे जवळचे संबंध निर्माण झाले. त्यांची स्मृती अतिशय तीक्ष्ण होती. राज्याचा सखोल अभ्यास होता. अशा विचारवंताची उपेक्षाच झाली.विचारांना बळकटी देण्याचे काम : कोतापल्लेडॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, ‘रा. ना. चव्हाण यांच्या विवेकी विचारांना बळकटी देण्याचे काम या पुरस्कारामुळे होते आहे. समतोल व्यक्तिमत्त्व राखत समाजावर भाष्य करण्याचे काम रा. ना. चव्हाण यांनी केले. त्यांचे वाड्.मय वाचणे आज काळाची गरज आहे. लेखन प्रकाशन व अनेक उपक्रमांतून समाजाचे ॠण फेडण्याचे काम चव्हाण कुटुंब करत आहे,’ वैचारिक संपत्तीचे जतन : भोसलेद. ता. भोसले म्हणाले, ‘वडिलांची वैचारिक संपत्ती जतन करणे, प्रकाशित करणे व लोकांपुढे आणण्याचे कमालीचे मोठे काम चव्हाण कुटुंब करत आहे. मोठ्या कुटुंबापेक्षा सुसंस्कारीत कुटुंबाचा सहवास लाभणे आनंददायी आहे. डॉ. चौसाळकर यांचे बरेच साहित्य मी वाचले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. संशोधन व प्रबोधन कौशल्य त्यांच्यात पाहायला मिळते.
रा. ना. चव्हाण यांच्या विचारांची गरज
By admin | Published: April 10, 2017 11:36 PM