आदर्की : फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की महसुली मंडलात वादळी वारा, विजेच्या गडगडासह गारपीट झाल्याने ज्वारी, गहू, हरभरा, टॉमेटो, कांदा आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
फलटण तालुका रब्बीचा असल्याने या हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. काही शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी काढणीस प्रांरभ केल्याने ज्वारी कणसे, कडबा शेतात आहे, तर ज्वारी काढणीस आली आहे. मात्र, मजूर नसल्याने उभी आहे. हरभरा काढणीस सुरुवात होऊन हरभऱ्याचे ढीग शेतात आहेत. गहू पीक आठ दिवसांत काढणीस येणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या हातात येणार असतानाच गुरुवारी दुपारी ३ वाजता जोरदार पाऊस, विजेचा कडकडाट, वारा, तुरळक गारा पडल्याने ज्वारी, गहू भुईसपाट झाली. सुमारे तासभर कमी-जास्त पाऊस पडल्याने गहू व ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा काढणीस आलेला व काढून टाकलेल्या कांद्यात पाणी साठल्याने कांद्याचे नुकसान होणार आहे. हाताला आलेली पिके वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता.
18आदर्की पाऊस
फोटो : आळजापूर (ता. फलटण) येथील शेतकरी विठ्ठल कचरे यांचा कांदा भिजला आहे.