लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : जावळीचा भाग हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पर्जन्यमानानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. आज भागातील शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. अधिकचे उत्पादनवाढीसाठी यामुळे प्रयत्न होत आहेत. याची प्रचिती रब्बीच्या हंगामात पाहायला मिळाली. सन २०२०-२१ रब्बी ज्वारीच्या पीक स्पर्धेत तालुक्यातील सोनगावच्या साहेबराव मन्याबा चिकणे यांनी आपल्या शेतात ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवत जावळीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषिदिनी यांचा मुंबई या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहेबराब चिकणे यांच्या वतीने त्यांचा मुलगा संदीप चिकणे यांनी हा सन्मान स्वीकारला. चिकणे यांनी सोनगाव या ठिकाणच्या आपल्या शेतीमध्ये फुले रेवती या ज्वारीच्या वाणाचा वापर केला. याकरिता प्रतिएकरी चार किलो बियाण्यांवर रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून शेतात पेरणी केली. पेरणीकरिता पाच बैलगाड्या शेणखत, १०० किलो निंबोळी पेंड या जैविक खताबरोबरच, १०:२६:२६ १५० किलो, सिलिकॉन, मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी पाच किलो, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी आठ किलो आदी खतांचा पेरणीवेळी योग्य वापर करण्यात आला.
पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो युरिया डोस देऊन पाणी देण्यात आले. पिकांच्या योग्य वाढीसाठी तण, कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना केल्या. वेळोवेळी फवारणी केली गेली. याचबरोबर पेरणीनंतर २१ दिवसांनी विरळणी करून दाट झालेली रोपे उपटून काढण्यात आली. पिकाला पाणी देताना प्रत्येक वेळी जीवांमृताचाही वापर करण्यात आला. विद्राव्य खतांची २१,३०,४० आणि ६० दिवसांनी फवारणी केली. अगदी सुरुवातीपासून पाण्याचा सुयोग्य पद्धतीने वापर करण्यात आला. शेती शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. याचाच परिपाक म्हणून एका एकरामधून ४०.४ इतके विक्रमी उत्पादन मिळाल्याचे साहेबराव चिकणे यांनी सांगितले. याकरिता कृषी विभागाचे सुरुवातीपासून मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
(कोट)
रब्बी हंगाम सन २०२०-२१ च्या ज्वारीच्या पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले. सुरुवातीपासून याकरिता तालुका कृषी अधिकारी देशमुख, कृषी सहायक भानुदास चोरगे यांच्याकडून मार्गदर्शक होत राहिले. बीजप्रक्रिया करण्यापासून ते कापणीपर्यंत योग्य नियोजन आणि वेळेत आवश्यक बाबी पिकासाठी दिल्या गेल्या. यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले.
-साहेबराव चिकणे, प्रगतशील शेतकरी
कोट: रब्बी ज्वारीकरिता चिकणे यांच्या शेतात बीजप्रक्रियेपासून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अगदी छोट्या छोट्या घटकांचाही बारकाईने समावेश करण्यात आला. पाण्याचा सुयोग्य व संरक्षित वापर करून खतांचा डोस, तसेच जैविक फवारणी याचे नियोजन केले. ज्वारीचा उत्पादनाचा तालुका नसतानाही सुरुवातीपासूनच पिकाच्या गरजेनुसार पाणी व इतर घटकांचा पुरवठा झाल्याने जावळीसारख्या दुर्गम भागातील रब्बीच्या ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात शेतकऱ्याला यश मिळाले.
-रमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी जावळी
जावळी
फोटो: कृषिदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते साहेबराव चिकणे यांच्या वतीने त्यांचा मुलगा संदीप चिकणे यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.